वेशभूषेच्या माध्यमातून एखाद्या प्रांताची संस्कृती दिसून येत असते. दिवाळीचा सण जवळ येताच पारंपरिक कुर्ता-पायजमा खरेदी करण्यासाठी लगबग सुरू होते. गणेशोत्सवातही कुर्ता खरेदीकडे तरुणाईचा कल असतो. यंदा गणेशोत्सवात ईदची धामधूम असल्याने पठाणी आणि विविध प्रकारच्या कुर्त्यांनी बाजारपेठा फुलून गेल्या आहेत. ईदसाठी पुरुष मंडळी आवर्जून पठाणी खरेदी करतात. काल-परवापर्यंत पठाणीचा पेहराव मुस्लिम धर्मीयांपर्यंत मर्यादित असताना आता गणेशोत्सवातही पठाणीशी साधम्र्य साधतील, असे कुर्ते बाजारात दिसू लागले आहेत. यासोबत टीशर्ट्सवर गणेशाची प्रतिकृती दर्शविणाऱ्या वेगवेगळ्या प्रिंट्स दिसू लागल्या आहेत. टीशर्ट्सवर अवतरलेले गणराय तरुणांसाठी विशेष आकर्षणाचा विषय ठरू लागले असून उत्सवाच्या दहा दिवसांत वेगवेगळ्या प्रिंट्सचे टीशर्ट वापरण्याकडे तरुणाईचा कल दिसू लागला आहे.

पारंपरिक सणात किंवा काही सांस्कृतिक कार्यक्रमांत पुरुषांचा पठाणीच्या पेहरावाकडे अधिक कल दिसून येतो. सुरुवातीला केवळ सफेद रंगांमध्ये किंवा प्लेन कपडय़ात उपलब्ध होणारी पठाणी अलीकडे वेगवेगळ्या रंगांत बाजारात उपलब्ध आहे. नेहमीचा कुर्ता-पायजमा असा पेहराव करून कंटाळलेल्या तरुण मंडळींना फॅशनेबल मात्र सुटसुटीत असा पठाणी पेहराव पसंतीस उतरू लागला आहे. पठाणीमध्ये कॉटन, सिल्क, होजिअरी मटेरिअल्स इत्यादी अनेक प्रकार उपलब्ध आहेत. काळाप्रमाणे फॅशनची व्याख्याही बदलली असे आपण म्हणतो. पठाणी या प्रकारातसुद्धा पूर्वीचे साधेपण जाऊन अलीकडच्या तरुणांना भावतील असे काही प्रकार यात उपलब्ध आहेत. बारीक नक्षीकाम केलेली काही पठाणी, काही नक्षीकाम नसलेली प्लेन, तर काही लग्नसमारंभात परिधान करता येतील, असे जरदोसी नक्षीकाम केलेल्या पठाणी आकर्षक रंगात ठाण्यातील बाजारपेठांमध्ये पाहायला मिळतात.

पठाणीचे प्रकार
’जरदोसी पठाणीच्या कॉलरवर आणि बाह्यांवर केलेले बारीक नक्षीकाम तसेच पठाणीच्या दोन्ही बाजूंच्या कटला असणारी नाजूक जरदोसी नक्षी शोभून दिसते. ही पठाणी धोतीवर परिधान करण्यास तरुणांची जास्त पसंती आहे.

’पठाणी सूट – पठाणी सूटमध्ये कुर्ता, धोतीस्टाईल पायजमा आणि त्यावर जॅकेट असा एकत्रित पेहराव असतो. कॉटन, सिल्क, सॅटीन, मिक्स अशा विविध कापडांमध्ये उपलब्ध आहे. कॉटनमध्ये पांढरा, फिक्कट गुलाबी, फिक्कट निळा अशा रंगांना अधिक पसंती दिली जात आहे. त्याचबरोबर सॅटिनमधील काळा कुर्त्यांने तर तरुणांच्या मनाचा ताबा घेतला आहे.

’चिकन नक्षी केलेले पठाणी- धाग्यांच्या घट्ट अशा नक्षीला चिकन नक्षी असे म्हणतात. मुख्यत्वे कॉटनच्या कपडय़ावर अशा प्रकारची नक्षी केलेली असते. चिकन नक्षी केलेला कुर्ता व त्यावर घेरदार असा पठाणी पायजामा तरुणांना अधिक भावू लागला आहे. यामध्ये पांढरा शुभ्र रंग सर्वाधिक पंसती मिळवत आहे.

’भरजरी पठाणी – या पाठाणीचे वैशिष्टय़ म्हणजे यावर विविध प्रकारच्या जरींची नक्षी केलेली असते. त्यामध्ये मोतीवर्क, जरीवर्क, पिंट्रेड वर्क, वेलवेट पेस्टिंग वर्क , हॅण्डिक्राफ्ट, एम्ब्रॉयडरी वर्क, अशा प्रकारचे नक्षीकाम केलेले असते. या पठाणी वजनाने जड असून त्यामध्ये गडद रंगांचा अधिक वापर केला जातो. लाल, सोनेरी, निळा, हिरवा आदी रंगांवर कुंदन व हिरेजडित पठाणी तरुण लग्नात परिधान करतात.