देशातील ऑटोमोबाइल सेक्टरमध्ये क्रॉस-बॅजिंग (भागीदारी अंतर्गत थोड्याफार बदलांसह एकाच प्रकारचे प्रोडक्ट निर्माण करणे) रणनितीला अद्याप यश मिळालेलं नाही. याचं ताजं उदाहरण म्हणजे टोयोटा ग्लांझा आणि आणि मारुती सुझुकी बलेनो या गाड्या. टोयोटा कंपनीने प्रीमियम हॅचबॅक प्रकारातील ‘ग्लांझा’कार लाँच केल्यापासून बलेनोच्या विक्रीमध्ये घट झाली आहे. टोयोटा आणि सुझुकी यांच्यातील संयुक्त करारानुसार निर्मिती केलेली ग्लांझा ही पहिलीच कार आहे.

क्रॉस-बॅजिंग अंतर्गत एकाच तंत्रज्ञानावर वाहनांचं उत्पादन घेतलं जातं. भागीदारी केलेल्या कंपन्या केवळ डिझाइनमध्ये थोडाफार बदल करतात. टोयोटा आणि सुझुकीनेही २०१७ मध्ये भागीदारी केली होती. यानुसार मारुतीने २०१५ मध्ये लाँच झालेली लोकप्रिय कार बलेनोचं मॉडेल टोयोटाशी शेअर केलं होतं. त्यानंतर बलेनोच्या मॉडेलनुसार ‘ग्लांझा’चे डिझाइन करण्यात आले आणि जून महिन्यात ही कार लाँच झाली. पण ग्लांझा लाँच झाल्यापासून बलेनोच्या विक्रीवर परिणाम झाला आहे. बलेनोची दरमहा विक्रीत घट झाली असून १२ हजार युनिट इतकी झाली आहे. वर्षभरापूर्वी हा आकडा १५-१६ हजार युनिट्सच्या घरात होता.

आणखी वाचा : Toyota Glanza साठी नवीन व्हेरिअंट लाँच, किंमत 6.98 लाख रुपये

दरम्यान, लाँग टर्ममध्ये या रणनितीचा फायदा होईल अशी अपेक्षा दोन्ही कंपन्यांना आहे. पण, बलेनो-ग्लांझाची भागीदारीही निसान सनी – रेनॉ स्काला आणि फोक्सवॅगन व्हेंटो-स्कोडा रॅपिड यांच्याच मार्गावर जाताना दिसतेय. अनेक तज्ज्ञांनी बलेनोच्या सध्याच्या विक्रीच्या आकड्यावर चिंता व्यक्त केली आहे. तर, मारुतीचे चेअरमन आर सी भार्गव यांनी मात्र काही दिवसांपूर्वी इकॉनॉमिक टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, भागीदारीमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते त्यामुळे क्रॉस-बॅजिंगबाबत चिंता नसल्याचं म्हटलं होतं.