आठवडय़ातून दोन वेळा वाटीभर दही खाल्ल्याने हृदयरोगाचा धोका उद्भवण्याची शक्यता कमी होत असल्याचा दावा एका अभ्यासातून करण्यात आला आहे.

उच्च रक्तदाब हा हृदयाशी संबंधित मोठा विकार आहे. वैद्यकीय चाचण्यांमधून दुग्धजन्य पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे पुरावे यापूर्वी मांडण्यात आले आहेत.

हा अभ्यास ‘अमेरिकन जर्नल ऑफ हायपरटेन्शन’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

दीर्घकाल दह्य़ाचे सेवनामुळे हृदयरोग विकसित होण्याची शक्यता कमी होत असल्याचे आम्हाला आढळून आले आहे.

दुग्धजन्य पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले असल्याचे यापूर्वीच्या अभ्यासांमध्ये आढळून आले असल्याचे बोस्टन वैद्यकीय विद्यापीठाचे जस्टिन ब्युएनडिया यांनी सांगितले. अभ्यासाच्या निकालांमधून नवे पुरावे समोर आले आहेत. केवळ दह्य़ाचे सेवन किंवा फळे, भाज्या आणि धान्यासोबत दह्य़ाचे सेवन हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त असल्याचे समोर आले आहे, असे ब्युएनडिया यांनी सांगितले. या अभ्यासासाठी उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या ३० ते ५५ वयोगटातील ५५ हजार महिलांचा आणि ४० ते ७५ वयोगटातील १८ हजार पुरुषांचा समावेश करण्यात आला होता.

दह्य़ाचे नियमित सेवन केल्याने महिलांमध्ये दयविकाराच्या झटक्याची शक्यता ३० टक्क्यांनी कमी होते.

तर पुरुषांमध्ये हे प्रमाण १९ टक्क्यांनी कमी होत असल्याचे आढळले. या दोन्ही गटांमधील ज्या सदस्यांनी दर आठवडय़ाला दोन वाटय़ाहून अधिक दह्य़ाचे सेवन केले त्याच्यांमध्ये हृदयविकार होण्याचा धोका २० टक्क्यांनी कमी झाला असे अभ्यासानंतरच्या पाठपुराव्याच्या निष्कर्षांना पडताळल्यानंतर संशोधकांनी सांगितले.