मोबाईल हा सध्या बहुतांश जणांच्या आयुष्यातील अविभाज्य भाग झाला आहे. सकाळच्या गजरापासून ते रात्रीच्या कामांपर्यंत सर्व गोष्टी सध्या एका क्लिकवर शक्य झाल्या आहेत. मोबाईल कंपन्याही दिवसागणिक एकाहून एक फिचर्स असणारे मोबाईल बाजारात आणत आहेत. ग्राहकांचा मोबाईलचा वापर जास्तीत जास्त सोपा व्हावा यासाठी या कंपन्यांमध्ये मोठी स्पर्धा असल्याचे चित्र बघायला मिळते. असे असतानाही आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला आवश्यक नसणारी फिचर्स नसल्याचे भारतीयांचे म्हणणे आहे. जवळपास ८१ टक्के भारतीयांचे आपल्या मोबाईलमधील फीचर्स उपयोगाची नसल्याचे म्हणणे आहे. ‘नाइन्टी वन मोबाइल्स डॉट कॉम’ या वेबसाइटने ‘कन्झ्युमर इनसाइट्स स्टडी २०१८’ हा अहवाल नुकताच जाहीर केला. त्यावरुन ही आकडेवारी समोर आली आहे.

या सर्वेक्षणामध्ये १८ ते ३० वयोगटातील १५ हजार मोबाईल युजर्सनी सहभाग घेतला होता. त्यातील ८१ टक्के जण आपल्या फोनमधील वेगवेगळ्या फीचर्सबाबत नाखूश असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातील २१ टक्के ग्राहकांनी आपला स्मार्टफोन वॉटरप्रूफ नसल्याचे सांगितले. तर १९ टक्के ग्राहकांनी आपल्या स्मार्टफोनमध्ये फ्रंट फेसिंग फ्लॅश नसल्याची खंत व्यक्त केली. तर ११ टक्के लोकांनी फोनमध्ये फेस लॉकींगची सुविधा नसल्याने आपण निराश असल्याचे म्हटले. आपण वापरत असलेल्या स्मार्टफोनचा कंटाळा आल्याने किंवा अपडेटेड स्मार्टफोन हवा असल्याने स्मार्टफोन बदलणाऱ्यांचे प्रमाणही भारतात जास्त असल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

स्मार्टफोनच्या बॅटरीबाबतही असंख्य जण नाराज असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. अनेक सॉफ्टवेअर सारखी बंद पडत असल्याची तक्रारही बऱ्याच जणांनी केली. आपण वापरत असलेल्या फोनचा कंटाळा आल्याने किंवा अपडेटेड फोन खरेदी करायचा असल्याने वर्षभरातच दुसरा अपडेटेड स्मार्टफोन खरेदी करण्यावर अनेकांचा भर असल्याचेही दिसून आले आहे. याशिवाय अनेक जण ब्रँडच्या बाबतीत चोखंदळ असल्याचेही या अहवालातून समोर आले आहे. एका नामवंत ब्रँडचा स्मार्टफोन वापरत असल्यास त्यानंतर ब्रँड बदलण्याची इच्छा नसल्याचेही या लोकांनी नमूद केल्याचे सर्वेक्षणात दिसून आले.