ज्या लोकांना सकाळी उठून व्यायामशाळेत जाण्याचा कंटाळा येतो त्यांच्यासाठी आनंददायी बातमी आहे. नियमित सायकल चालवण्यामुळे देखील आठवडाभर व्यायामशाळेत गेल्यानंतरचे फायदे होत असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे.

ज्या लठ्ठ व्यक्तींना व्यायामशाळेत जाण्यासाठी वेळ नाही, त्यांनी नियमित सायकल चालवणे फायदेशीर आहे. आमच्या निष्कर्षांतून नियमित सायकल चालवणे आणि व्यायामशाळेत व्यायाम करणे यातून निघणारे परिणाम जवळपास सारखेच असल्याचे डेन्मार्कमधील कोपेनहेगन युनिव्हर्सिटीचे प्राध्यापक बेंटे स्टॅल्क्नेचट यांनी सांगितले.

‘ओबेसिटी’ या आंतरराष्ट्रीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध करण्यात आलेल्या  संशोधनामध्ये याबाबत माहिती देण्यात आली आहे. या अभ्यासामध्ये १३० अतिलठ्ठ व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता.  सहभागी व्यक्तींचे चार गट करण्यात आले. यातील एका गटास नियमित सायकल चालवण्यासाठी देण्यात आली. दोन गटांना आठवडय़ातून पाच वेळा व्यायाम करण्यास सांगण्यात आले. एका गटास अधिक तर दुसऱ्या गटास कमी व्यायाम करण्यास सांगण्यात आले. तर शेवटच्या चौथ्या गटास काहीही न करण्यास सांगण्यात आले.

ज्या गटास सायकल चालवण्यास सांगण्यात आले होते, त्यांच्यामधील कॅलरीज व्यायामशाळेत व्यायाम करणाऱ्या गटाप्रमाणे कमी झाल्याचे दिसून आले.

जवळपास सहा महिन्यानंतर स्थिर गट सोडून इतर सर्व गटातील व्यक्तींच्या चरबीमध्ये (फॅट) घट झाली होती. मोकळय़ा वेळेत वजन कमी करण्यासाठी सायकल चालविणे अतिशय फायदेशीर असल्याचे यातून दिसून येते, असे संशोधकांनी सांगितले.