रोज ४० ग्रॅम लोणी किंवा चीजसेवन केल्याने पक्षाघात व हृदयविकाराचा धोका कमी होतो, असे संशोधनात दिसून आले आहे.

चीनमधील सोचॉ विद्यापीठात हे संशोधन झाले असून चीज किंवा लोणी हे अनेक जीवनसत्त्वे, खनिजे व प्रथिनांनी युक्त आहे. त्यामुळे हृदयविकारापासून संरक्षण मिळते. युरोपियन जर्नल ऑफ न्यूट्रिशन या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले असून लोणी किंवा चीजमध्ये चांगले कोलेस्टेरॉल वाढवण्याची तर वाईट कोलेस्टेरॉल कमी करण्याची क्षमता असते. चीजमध्ये एक प्रकारचे आम्ल असते, ज्यामुळे धमन्यांमध्ये अडथळे राहात नाहीत. संपृक्त मेद पदार्थ हृदयविकार वाढवतात, असा प्रचार गेली दहा वर्षे चालू असून प्रत्यक्षात तसे नाही हे या संशोधनातून दिसून आले आहे.

साजूक तूप, चीज यामुळे हृदयविकाराचा धोका वाढत नाही, उलट तो कमी होतो, असा दावा ब्रिटनच्या रीडिंग युनिव्हर्सिटीचे आहारतज्ज्ञ आयन गिव्हान्स यांनी केला.

चीज किंवा ताज्या लोण्यात असलेल्या गुणधर्मामुळे मेंदूचा रक्तपुरवठाही सुरळीत राहतो, त्यामुळे पक्षाघाताचा धोका कमी होतो, असा दावा करण्यात आला आहे.