मोटारसायकलच्या सहाय्याने अद्भुत कारनामे करण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या रॉबी मॅडिसनने पुन्हा एकदा साऱ्या जगाला थक्क करून सोडले आहे. यापूर्वीही त्याने मोटारसायकलच्या सहाय्याने जमिनीवर आणि हवेत डोळ्यांवर विश्वास बसणार नाही, अशा गोष्टी करून दाखविल्या आहेत. मोटारसायकलला हवेत नेत एका उडीत फुटबॉल मैदानाइतके अंतर पार करणे असो किंवा एकाच उडीत ग्रीसमधील कॉरिंथ कालवा पार करणे असो, अशी अनेक अशक्यप्राय कृत्ये त्याने आजपर्यंत शक्य करून दाखविली होती. मात्र, काही दिवसांपूर्वी त्याने चक्क समुद्राच्या लाटांवर मोटारसायकल चालवण्याची किमया साधली आहे. फ्रान्सच्या ताहिती या बेटावरील समुद्रात एखाद्या सर्फिंग बोर्डप्रमाणे लाटा कापणाऱ्या रॉबीच्या बाईकचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर चांगलाच व्हायरल झाला आहे. यानिमित्ताने रॉबीच्या चाहत्यांना पुन्हा एकदा त्याच्या अमानवी क्षमतांचा प्रत्यय आला, असे म्हणावे लागेल.