जवळपास १० कोटी भारतीयांच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा चोरीला गेल्याचं धक्कादायक वृत्त आहे. सायबर सिक्युरिटी रिसर्चर राजशेखर राजहरिया यांनी हा दावा केलाय.

भारतीय युजर्सच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा डेटा चोरी झाला असून याची माहिती डार्क वेबवर विकली जात असल्याचा धक्कादायक दावा राजशेखर यांनी ट्विटरवर केला आहे.

डार्क वेबवर (Dark web) उपलब्ध असलेला हा डेटा मुख्यतः बंगळुरूत मुख्यालय असलेल्या जस-पे (Juspay) या डिजिटल पेमेंट गेटवेच्या सर्वरवरून लीक झाल्याचं त्यांनी सांगितलं.

चोरीला गेलेल्या डेटामध्ये भारतीय कार्डधारकांचे संपूर्ण नाव, त्यांचा मोबाइल नंबर, ईमेल आयडी, परमनंट अकाउंट नंबर (PAN) आणि कार्डवरील नंबर यांचा समावेश आहे. चोरीला गेलेला डेटा डार्क वेबवर लिलावात उपलब्ध असल्याचा स्क्रीनशॉटही राजशेखर यांनी शेअर केलाय.

याबाबत Juspay चे संस्थापक विमल कुमार यांनी १८ ऑगस्ट रोजी सर्व्हरवर हॅकिंगचा प्रयत्न झाल्याचं मान्य केलं पण त्यावर तातडीने ताबा मिळवण्यात यश आलं असं सांगितलं. मोबाइल नंबर, ईमेल आयडी, परमनंट अकाउंट नंबर असा कोणताही महत्त्वाचा डेटा चोरीला गेलेला नाही. चोरीला गेलेल्या डेटाची १० कोटींपेक्षा खूप कमी संख्या आहे असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. दरम्यान, गेल्या महिन्यातही राजशेखर यांनी देशातील 70 लाखांहून अधिक युजर्सचा डेटा लीक झाल्याचा दावा केला होता.