रिलायन्स जिओने दोन वर्षांच्या आत भारताला जगातील सर्वात मोठा मोबाइल ब्रॉडबॅण्ड डाटा वापर करणारा देश बनवलं आहे. भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांना जिओची संकल्पना कुठून सुचली तुम्हाला माहितीये का ? मुलगी इशा अंबानीशी चर्चा करताना मुकेश अंबानींच्या डोक्यात ही आयडिला आली आणि जिओचा जन्म झाला. स्वत: मुकेश अंबानी यांनी हा खुलासा केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रिजला ‘ड्रायव्हर्स ऑफ चेंज’ पुरस्कार मिळाल्यानंतर बोलताना मुकेश अंबानी यांनी इशाने २०११ मध्ये आपल्याला ही आयडिया दिल्याचा खुलासा केला.

मुकेश अंबानी यांनी सांगितलं की, ‘जिओची आयडिया सर्वात आधी माझ्या मुलीने मला २०११ मध्ये दिली होती. तेव्हा ती येल युनिव्हर्सिटीत शिकत होती, आणि सुट्ट्यांमध्ये घरी आली होती. तिला कॉलेजचं एक काम पुर्ण करायचं होतं. त्यावेळी चिडलेल्या इशाने आपल्या घरातील इंटरनेट खूपच वाईट असल्याचं म्हटलं होतं’.

‘नंतर आकाशचं आणि माझं बोलणं झालं. आकाशने मला डिजिटल वर्ल्डची माहिती दिली. तुमच्या पिढीला या गोष्टी कळत नाहीत असंही तो बोलला’, असं मुकेश अंबानींनी सांगितलं. त्यांच्याशी चर्चा केल्यानंतरच जिओची संकल्पना डोक्यात आल्याचं यावेळी मुकेश अंबानी बोलले.

पुढे बोलताना त्यांनी सांगितलं की, ‘इशा आणि तिचा जुळा भाऊ आकाश भारतातील तरुण पिढी आहे, आणि ही पिढी सर्वोत्तम व्हावी यासाठी त्यांना जास्त वेळ खर्ची घालायला आवडत नाही. त्यांनीच मला समजावलं की, ब्रॉडबॅण्ड इंटरनेट असं तंत्र आहे ज्यापासून भारताला जास्त दूर ठेवलं जाऊ शकत नाही’.

यावेळी अंबानींनी पुन्हा एकदा कशाप्रकारे जिओने लाँच होताच फक्त १७० दिवसांत १० कोटी ग्राहक मिळवल्याचं सांगितलं. जिओची संकल्पना सत्यात उतरवण्यासाठी रिलायन्सने एकूण दोन हजार कोटींची गुंतवणूक केली. २०१६ मध्ये सुरु झालेल्या जिओने एंट्री करताच टेलिकॉम मार्केटमध्ये खळबळ माजली होती. जिओमुळे इतर कंपन्यांनाही स्पर्धेत उतरण्यासाठी आपले दर उरतवावे लागले. सुरुवातीच्या दिवसांमध्ये फ्री कॉल्स आणि डाटा देत जिओने टेलिकॉम मार्केटवरच कब्जा केला होता.