हवेच्या प्रदूषणाचा सर्वाधिक परिणाम गरोदर महिलांवर होत असून त्यामुळे मृतगर्भजननेचा धोका अधिक असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले आहे.
२०१५मध्ये जगभरात २.६ दशलक्ष मृतगर्भजनना झाल्याचे स्पष्ट झाले आहे. भौगोलिक फरकामुळे या घटना घडल्या असून त्या टाळता येण्यासारख्या होत्या, असे फिनलॅण्डच्या ओऊल विद्यापीठातील संशोधकांनी सांगितले आहे. यासंबंधी १३ संशोधने करण्यात आली असून गर्भधारणेच्या तिसऱ्या टप्प्यात हवेच्या प्रदूषणाचा धोका अधिक असल्याचे संशोधकांनी मांडले आहे. चार मायक्रोग्राम प्रति क्युबिक मीटर या प्रमाणात धोक्याची पातळी वाढते, असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. नायट्रोजन डाय ऑक्साइड, कार्बन मोनोक्साइड यांसह १० इतर वायू आणि ओझोनमुळेही मृतगर्भजननेचा धोका वाढतो, असेही त्यांनी सांगितले.
कोपनहेगन विद्यापीठाचे अभ्यासक मॅरी पीडरसेन म्हणाले की, सभोवतालची हवा, लोकसंख्या आणि मृतगर्भजनना या विषयांवर भविष्यातही अभ्यास सुरूच राहील. सध्याचा अभ्यास, हवा प्रदूषणाचे नमुने आणि मृतगर्भजननेसंबंधीचा अभ्यास यांमुळे हवा प्रदूषणामुळे मृतगर्भजननेचे प्रमाण वाढत असल्याचे स्पष्ट होते, असे संशोधकांनी सांगितले. या विषयातील संशोधन ‘जनरल ऑक्युपेशन अ‍ॅण्ड एन्व्हॉर्नमेंटल मेडिसिन’ या दैनिकात प्रसिद्ध करण्यात आले आहे.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)