28 October 2020

News Flash

अनेक दशकांनी पुन्हा मोपेडनं मोटरबाइक्सना टाकलं मागे

कोविडच्या काळातही नोंदवली विक्रमी विक्री

संग्रहित छायाचित्र

अनेक दशकं भारतीयांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या टीव्हीएस मोपेडचे दिवस पुन्हा आले की काय अशी सध्याची स्थिती आहे. कारण या मोपेडनं यंदा नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. बिझनेसलाईनच्या वृत्तानुसार, टीव्हीएस मोटर कंपनीच्या मोपेडची मोटरसायकल्सपेक्षा जास्त विक्री नोंदवली गेली आहे.

एप्रिल ते सप्टेंबर या काळात टीव्हीएसच्या एकूण २,४४,४८७ मोटरसायकल्सच्या युनिट्सची विक्री झाली. तर मोपेडची यापेक्षा जास्त म्हणजे २,५१,१६६ इतकी विक्री झाली. यामागे कोविड-१९ची परिस्थिती कारणीभूत ठरल्याचं विश्लेषण तज्ज्ञांकडून केलं जात आहे. लोकांना परवडणाऱ्या वैयक्तिक वाहनाची गरज असल्याने ग्राहकांचा मोपेडकडे जास्त कल असल्याचे दिसून आले. नागरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात लोकांकडे उत्पन्नाचे मार्ग उपलब्ध राहिल्याने ग्रामीण भागातच मोपेडला जास्त पसंती मिळाली. या मोपेडमध्ये काळानुसार आवश्यक बदल करण्यात आले आहेत. जसे की त्याला बीएस-४ चे इंजिन, मोटरसायकलच्या सुरुवातीच्या किंमतींपेक्षा कमी किंमत आणि ग्रामीण भागातून होत असलेली मागणी यामुळे मोपेडचा खपही वाढला.

मोपेडचा विकास का झाला?

कॉर्पोरेट रेटिंग आयसीआरएचे सेक्टर हेड आणि उपाध्यक्ष शमशेर दिवाण म्हणाले, “मोपेड आणि नव्या बीएस-४ इंजिनच्या एन्ट्री लेव्हलच्या मोटरसायकल्सच्या किंमतीतील फरक, नव्या तंत्रज्ञानामुळे इंधनाची जास्त कार्यक्षमता, मोपेडच्या खरेदीसाठी राज्यांकडून (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा) देण्यात येणाऱ्या अनुदानाची मदत या आवश्यक गोष्टींमुळे मोपेडचा विकास होण्यास मदत झाली आहे.  ऑटो क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात, विशिष्ट ग्राहकांना विशेषतः ग्रामीण भागात अद्यापही मोपेडला मागणी आहे. दरम्यान, हळूहळू अर्थव्यवस्था खुली होत असल्याने टीव्हीएसच्या मोटरसायकल्सचीही विक्री सुरु झाली आहे. ग्राहकांमध्ये खरेदीचा विश्वास निर्माण होत असल्याने वाहनविक्री हळूहळू वेग घेत आहे.

मोपेड आणि मोटरसायकलच्या किंमतीतील फरक

दरम्यान, मोपेडची किंमत ३९,९९० रुपयांपासून सुरु होते. तर एन्ट्री लेव्हलच्या मोटरसायकलची किंमत यापेक्षा १०,००० रुपयांची जास्त आहे. त्याचबरोबर, टीव्हीएस कंपनी ही देशातील एकमेव कंपनी आहे जी मोपेडची विक्री करते. त्याचबरोबर आधीच्या ७० सीसीच्या मोपेडपेक्षा नव्या XL100 या मोपेडच्या मॉडेलमध्ये अनेक प्रकारही उपलब्ध आहेत.

मोटरसायकलच्या विक्रीतही होतेय वाढ

टीव्हीएस मोटरसायकलच्या विक्रीतही वाढ नोंदवली जात आहे. ऑगस्ट २०२०मध्ये १.२० लाख युनिट्सची विक्री झाली तर सप्टेंबरमध्ये १.४० लाख मोटरसायकल विकल्या गेल्या. त्याचवेळी गेल्या दोन महिन्यांत मोपेडची प्रत्येक महिन्यात ७०,००० युनिट्सची विक्री झाली. टीव्हीएस मोपेडची ही कामगिरी पाहून मोटरबाईक बनवणाऱ्या इतर कंपन्याही या सेगमेंटमध्ये आपल्या स्वतःच्या मोपेड बाजारात आणू शकतात, अशी शक्यताही तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 17, 2020 9:13 am

Web Title: decades later mopeds have overtaken motorbikes aau 85
Next Stories
1 नवरात्रीचे उपवास करताय? हे लक्षात ठेवाच
2 Big Billion Days Sale 2020 : 4K क्यूएलईडी आणि युएचडी TV वर ५० टक्केंची सूट
3 जबरदस्त! ३२ इंचाचा स्मार्ट TV फक्त ३,२३२ रुपयांत
Just Now!
X