निर्जलीकरणामुळे (डिहायड्रेशन) शरीराच्या आकलनक्षमतेवर (कॉग्निटिव्ह अ‍ॅबिलिटी) विपरीत परिणाम होत असल्याचे नव्या अभ्यासातून दिसून आले आहे. व्यायाम किंवा अन्य कारणांमुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी झाले की शरीराची विविध बाबींचे आकलन करण्याची क्षमताही घटते.

अमेरिकेतील जॉर्जिया इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नोलॉजीच्या प्राध्यापिका मिंडी मिलार्ड-स्टॅफर्ड यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या गटाने या विषयावर संशोधन केले. त्यांनी या विषयावर प्रसिद्ध झालेल्या ६,५९१ शोधनिबंधांचा बारकाईने अभ्यास केला. त्यातून ३३ महत्त्वाचे प्रबंध निवडून त्यांचा अधिक सखोल अभ्यास केला. त्यातून त्यांच्या असे लक्षात आले की शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत गेले की मेंदूची आकलन करण्याची क्षमताही घटत जाते. काम, व्यायाम किंवा अन्य कारणांनी निर्जलीकरण होऊन बॉडी मास इंडेक्समध्ये (बीएमआय) १ ते ६ टक्के घट झाली असता त्याचा आकलनक्षमतेवर काय परिणाम होतो याचा या संशोधकांनी अभ्यास केला. त्यात असे लक्षात आले की पाणी कमी झाल्याने बीएमआय २ टक्क्य़ांनी घटला असता मध्यम स्वरूपाच्या आकलनात्मक अडचणी जाणवू लागतात. तर निर्जलीकरणाने बीएमआयमध्ये ६ टक्के घट झाली तर गंभीर स्वरूपाचे परिणाम दिसू लागतात. शरीरातील पाणी कमी झाले असता सुरुवातीला प्रतिक्षिप्त क्रियांवर फारसा परिणाम होत नसला तरी नंतर आसपासच्या परिस्थितीचे आकलन करून घेणे, नव्या गोष्टी समजून घेणे, एखाद्या बाबीवर लक्ष केंद्रित करणे, एकाग्रता, प्रश्न सोडवण्याची क्षमता अशा बाबींवर परिणाम होतो. पाण्याचे प्रमाण जसजसे कमी होत जाईल तसतशी आकलनक्षमता आणखी घटत जाते.

कार्यालयात एखाद्या बैठकीत अधिक वेळ चर्चा करणे, सलग बराच वेळ वाहन चालवणे, खेळांमधील सहभाग, सैन्यातील सेवा अशा कामांमध्ये बराच वेळ एकाग्रतेची गरज असते. त्यावर निर्जलीकरणाचा आणि त्यामुळे आकलनक्षमता घटण्याचा परिणाम होऊ शकतो, असे मिलार्ड-स्टॅफर्ड यांनी सांगितले.