केंद्र सरकारने काही दिवसांपूर्वीच लोकप्रिय ऑनलाइन बॅटल गेम ‘पबजी’वर भारतात बंदी घातली. याच गेमसाठी दिल्लीच्या तीमारपूरमध्ये राहणाऱ्या एका 15 वर्षांच्या मुलाने आपल्या आजोबांच्या अकाउंटमधून 2.34 लाख रुपये उडवल्याचं समोर आलं आहे. आजोबांना बँकेकडून खात्यामध्ये केवळ 275 रुपये शिल्लक असल्याचा मेसेज आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.

(PUBG लवकरच भारतात परतणार…कोरियाच्या कंपनीने चीनच्या ‘टेन्सेंट’कडून काढून घेतला गेमचा ताबा)

केवळ 275 रुपये अकाउंटमध्ये शिल्लक असल्याचा मेसेज वाचून आजोबांना धक्काच बसला. 65 वर्षांच्या आजोबांनी तातडीने तीमारपूर पोलीस आणि सायबर सेलकडे तक्रार केली. त्यानंतर पोलिसांनी केलेल्या तपासात 7 मार्च ते 8 मे या कालावधीत PUBG Mobile साठी आजोबांच्या अकाउंटमधून रक्कम ट्रान्सफर झाल्याचं समोर आलं. 2,34,497 रुपये या गेमसाठी उडवण्यात आले होते. डेबिट कार्डच्या मदतीने Paytm द्वारे पैसे ट्रांसफर झाल्याचं स्पष्ट झाल्यानंतर पोलिस आजोबांच्या नातवापर्यंत पोहोचले. केवळ 15 वर्षांचा हा मुलगा गेमसाठी पैसे ट्रांसफर केल्यानंतर बँकेकडून येणारा मेसेज आणि OTP बघून लगेच डिलिट करायचा, अशी माहिती पोलिसांनी दिली.

काही महिन्यांपासून पबजी गेम खेळत असून गेममध्ये इन-अ‍ॅप खरेदीसाठी आजोबांच्या डेबिट कार्डचा वापर केला, अशी कबुली या मुलाने दिली. आजोबांच्या पैशांद्वारे गेममध्ये इन-अ‍ॅप खरेदी करुन हा मुलगा काही दिवसांपूर्वीच गेमच्या ‘ace level’ ला पोहोचला होता. यापूर्वी पंजाबमध्ये एका 17 वर्षाच्या मुलाने आपल्या घरातल्यांचे 16 लाख रुपये PUBG Mobile साठी उडवल्याचं समोर आलं होतं. तर मोहालीमध्येही एका 15 वर्षांच्या मुलाने आपल्या आजोबांचं पेन्शन अकाउंट या गेमसाठी रिकाम केल्याचं उघडकीस आलं होतं. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच केंद्र सरकारने सुरक्षेच्या कारणास्तव 108 चिनी अ‍ॅप्स बॅन केले आहेत. त्यामध्ये पबजीचाही समावेश आहे.