News Flash

दिल्ली : 28 वर्षीय धूम्रपान न करणाऱ्या तरुणीला फुप्फुसाच्या कर्करोगाची लागण

धूम्रपान न करता प्रदूषणामुळे वयाच्या 30 वर्षांआधीच कर्करोगाची लागण झाल्याची ही एकप्रकारे पहिलीच घटना असल्याचं डॉक्टर म्हणाले

(सर गंगाराम रुग्णालयातील सेंटर फॉर चेस्ट सर्जरीचे अध्यक्ष डॉ. अरविंद कुमार, छायाचित्र सौजन्य - एएनआय )

फुप्फुसाचा कर्करोग हा केवळ धूम्रपान करणाऱ्या लोकांपर्यंत मर्यादित राहिला नसून वायू प्रदूषणामुळे धूम्रपान न करणाऱ्यांनाही हा कर्करोग होऊ शकतो असा दावा आधीपासूनच केला जात होता. हा दावा बळकट करणारी घटना दिल्लीमध्ये समोर आली आहे. येथे एका 28 वर्षीय धूम्रपान न करणाऱ्या तरुणीला कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने ग्रासल्याची बाब समोर आली आहे.

धोक्याची पातळी ओलांडलेल्या प्रदुषित हवेमुळे तरुणीला कर्करोग झाल्याची दाट शक्यता दिल्लीच्या सर गंगाराम रुग्णालयातील डॉक्टरांनी वर्तवली आहे. धूम्रपान न करता प्रदूषणामुळे वयाच्या 30 वर्षांआधीच कर्करोगाची लागण झाल्याची ही एकप्रकारे पहिलीच घटना असल्याचं डॉ. अरविंद कुमार म्हणाले. दरमहिन्याला किमान दोन असे रुग्ण समोर येत आहेत ज्यांना फुप्फुसाच्या कर्करोगाचा आजार झाल्याचं दिसतंय. असंही ते म्हणाले.

डॉ. अरविंद कुमार पुढे म्हणाले, गेल्या आठवड्यात माझ्या ओपीडीत एका मल्टिनॅशनल आयटी कंपनीत काम करणारी २८ वर्षीय तरुणी तपासणीसाठी आली होती. ही तरुणी जन्मापासून वयाच्या ६ व्या वर्षापर्यंत आपल्या कुटुंबासह गाजीपूर येथे राहत होती. त्यानंतर त्यांचे कुटुंब पश्चिम दिल्लीत रहायला गेले. या मुलीच्या कुटुंबात कोणीही धुम्रपान करीत नाही. तरीही या मुलीला कर्करोगाचे निदान कसे झाले? याचा अभ्यास केल्यानंतर त्याला दिल्लीतील वायू प्रदुषण कारणीभूत असल्याचे समोर आले आहे.

डॉक्टरांचे म्हणणे आहे की, जगातील सर्व मानवाच्या शरीराची संरचना एकसारखीच आहे. यामध्ये हवा प्रदुषण सायलेंट किलर म्हणून काम करतो. याचा परिणाम एक किंवा दोन वर्षात नाही तर अनेक दशकांनंतर दिसू शकतो. डब्ल्यूएचओने देखील हवा प्रदुषणाला जगभरात पब्लिक हेल्थ इमर्जन्सी घोषीत केले आहे. जर सरकारला या गोष्टीची पुष्टी करायची असेल तर सरकारने या तरुणीच्या आजारावर कोणत्याही संशोधन संस्थेतून पडताळणी करावी असे आवाहनही त्यांनी केले आहे.

नुकतेच केंद्र सरकारने लोकसभेत दिल्लीतील प्रदुषित हवेमुळे कोणाचाही मृत्यू झाला नसल्याचे सांगितले होते. त्यानंतर ही घटना समोर आली आहे.

ऑक्टोबर २०१८ मधील केंद्रीय विज्ञान मंत्रालयाच्या एका अहवालानुसार, दिल्लीत ४१ टक्के पीएम २.५ इतक्या तीव्रतेचे प्रदुषित कण वाहनांमधून बाहेर पडतात. २१.५ टक्के धूळ आणि १८ टक्के प्रदुषीत कण विविध कारखान्यातून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे हवेत पसरतात.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 31, 2019 9:29 am

Web Title: delhi 28 years non smoking girl dignosed with lung cancer due to pollution sas 89
Next Stories
1 ‘हर रिचार्ज पे इनाम’, व्होडाफोनची भन्नाट ऑफर
2 आता अ‍ॅमेझॉन उतरणार फूड डिलिव्हरी क्षेत्रात, झोमॅटो-स्विगीला टक्कर
3 आता ऑफलाइन खरेदी करा Realme चे 2 शानदार स्मार्टफोन
Just Now!
X