दिल्लीत हवा प्रदूषणाचा प्रश्न उग्र आहे, पण तेथील स्थानिक वाहतूक, बांधकामे व इतर बाबीतून बाहेर पडणारे सूक्ष्म कण त्याला कारणीभूत आहेत, असे नवीन अभ्यासात दिसून आले आहे. ब्रिटनमधील सरे विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी याचा अभ्यास केला असून त्यांच्या मते यात स्थानिक प्रदूषक कणच कारणीभूत आहेत. त्यामुळे प्रदूषण नियंत्रणात केवळ थंडीच्या दिवसात प्रयत्न करून उपयोग नाही, तर वर्षभर त्यासाठी काम करणे गरजेचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते जगात २०१६ मध्ये प्रदूषणाने ४२ लाख लोक अकाली मरण पावले. भारतात वर्षभरात सहा लाख लोक अकाली मृत्यू पावतात.

जगातील ज्या शहरांमध्ये प्रदूषण अधिक आहे त्यात दिल्लीचा समावेश आहे. ‘सस्टेनेबल सिटीज अँड सोसायटी’ या नियतकालिकात प्रसिद्ध शोधनिबंधानुसार दिल्ली, हरयाणा, उत्तर प्रदेश येथील हवा प्रदूषणाची १२ ठिकाणची चार वर्षांतील माहिती तपासण्यात आली असता असे दिसून आले,की त्यात पीएम २.५ व पीएम १० कणांचे प्रमाण जास्त आहे. त्यात नायट्रोजन,सल्फर डायॉक्साइड, कार्बन मोनॉक्साइड व ओझोनचे कण प्रदूषण करीत आहेत. उन्हाळा व पावसाळ्यापेक्षा हिवाळ्यात प्रदूषण जास्त असते, फक्त त्याला ओझोन पातळीचा अपवाद आहे. दिल्लीत थंडीच्या दिवसात पिकांचे तण जाळण्यामुळे शेजारील राज्यातून येणाऱ्या धुरामुळे प्रदूषण होते.

जैवभाराच्या ज्वलनातूनही प्रदूषके बाहेर पडतात. वाऱ्यांचा कमी वेग, कमी अवक्षेप यामुळे थंडीत प्रदूषण जास्त असते. सरे विद्यापीठाचे प्रशांत कुमार यांच्या मते हवामान बदलावर उपायांच्या निकडीबाबत जग एकवटले आहे ही चांगली गोष्ट आहे. आम्ही जे संशोधन केले त्यानुसार दिल्लीतील प्रदूषण केवळ शेजारील राज्यात पिकांचे तण जाळण्यामुळे होते असे नाही, तर त्याला स्थानिक घटकही तेवढेच कारणीभूत आहेत.