खराब उत्पादन किंवा खराब सेवेबद्दल तक्रार करण्यासाठी जर तुम्ही फेसबुक किंवा ट्विटर यांसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करत असाल तर तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ट्विटर आणि फेसबुकवर अनेक युजर्स एखाद्या कंपनी किंवा अ‍ॅप किंवा अन्य एखाद्या सेवेबाबत तक्रार करत असतात, अशा युजर्ससाठी दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने इशारा दिला आहे.

ट्विटर, फेसबुकसारख्या प्लॅटफॉर्मवर तक्रारी पोस्ट केल्यामुळे फसवणूक करणाऱ्यांना (स्कॅमर्स) संधी मिळते, असं दिल्ली पोलिसांनी सांगितलंय. जर तुम्ही वॉलेट, बँक अ‍ॅप्स, एअरलाइन्स अशा कोणत्याही मुद्द्यावर तुमची तक्रार सोशल मीडियावर पोस्ट केली तर फसवणूक करणाऱ्यांना (स्कॅमर्स) तुम्ही आकर्षित करत असतात, असा इशारा पोलिसांनी दिलाय. सोशल मीडियावर तक्रार करणाऱ्या युजर्सना फसवणूक करणारे स्कॅमर्स कस्टमर केअर अधिकारी बनून फोन करतात आणि त्यांचा खासगी डेटा मिळवतात. घोटाळे करणारे वैयक्तिक तपशील मिळविण्यासाठी ग्राहक सेवा अधिकारी म्हणून तोतयागिरी करू शकतात. यामुळे केवळ मोबाइल नंबर आणि ईमेल-आयडी यांसारखी माहिती गमावली जाऊ शकत नाही, तर एखाद्याची या सायबर फसवणूकीद्वारे आर्थिक फसवणूकही होऊ शकते, असा इशारा दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलने ट्विटरद्वारे दिला आहे.

आणखी वाचा- Signal येताच बंद झालं ‘मेड इन इंडिया अ‍ॅप Hike’, कोट्यवधी युजर्सनी केलं होतं डाउनलोड

एखाद्या मुद्द्यावर तक्रार करायची असल्यास संबंधित कंपनीच्या अधिकृत ईमेल आयडीचा वापर करावा किंवा ग्राहक सेवा केंद्रात संपर्क करुनही तक्रार करता येते, असा सल्लाही पोलिसांकडून देण्यात आला आहे. तसेच, कोणतीही कंपनी तुमच्याकडून आर्थिक व्यवहारांची माहिती मागत नाही तसेच कोणी तुमचा ओटीपी, पासवर्ड किंवा एटीएम पिन देखील विचारत नाही असंही पोलिसांनी स्पष्ट केलंय. त्यामुळे वैयक्तिक माहिती शेअर करु नका आणि सोशल मीडियावर तक्रार करताना सतर्क राहा असा सल्ला दिल्ली पोलिसांच्या सायबर क्राइम सेलकडून देण्यात आलाय.