साठ टक्के रुग्ण १३ ते ३० वयोगटातील; साथीचे सर्वाधिक रुग्ण भायखळा-दादरमध्ये
डेंग्यूच्या डंखाचा सर्वाधिक फटका तरुणांना बसला असून या वर्षांतील डेंग्यूचे सुमारे साठ टक्के रुग्ण १३ ते ३० वर्षे वयोगटातील आहेत. त्याच वेळी वर्षभरातील एकूण डेंग्यू रुग्णांपैकी ३५ टक्के रुग्ण सप्टेंबरच्या पहिल्या २० दिवसांत नोंदले गेले असून या साथीचा प्रभाव भायखळा, लालबाग, दादर या पट्टय़ात तसेच भांडुप आणि मुलुंडमध्येही दिसत आहे. डेंग्यूमुळे अंधेरी येथील ३६ वर्षांच्या महिलेचा झालेला मृत्यू या महिन्यातील दुसरा मृत्यू ठरला.
गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये सुरू झालेली डेंग्यूची साथ या वर्षांच्या फेब्रुवारीपर्यंत होती. सप्टेंबरमध्ये पुन्हा एकदा डेंग्यूची साथ आली आहे. महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातील अधिकृत नोंदीनुसार आतापर्यंत शहरात डेंग्यूचे ४६९ रुग्ण आढळले आहेत. त्यातील तब्बल २७५ रुग्ण हे १३ ते ३० या वयोगटातील आहेत. त्यातही २०४ युवक आहेत. याशिवाय १२ वर्षांपर्यंतच्या ७८ तर ३१ ते ४५ वयोगटातील ८१ जणांना डेंग्यू झाला. एकूण रुग्णांपैकी ३२० पुरुष तर १४९ स्त्रिया आहेत. डेंग्यू हा डासांवाटे पसरणारा आजार आहे. तो कोणालाही होऊ शकतो. मात्र साधारणत: जास्तीत जास्त ठिकाणी प्रवास करणाऱ्या व्यक्तींना डास चावण्याची शक्यताही जास्त असू शकते, त्यामुळे युवकांना हा आजार होण्याचे प्रमाण जास्त असल्याचे आढळते, असे राज्याच्या संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे म्हणाले.
दरवर्षी पाऊस जाताना डेंग्यूची साथ येते. या वेळी सप्टेंबरमध्येच डेंग्यूला सुरुवात झाली असून मलेरिया व साध्या तापापेक्षाही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या जास्त आहे. पालिकेनुसार १५ ते २१ सप्टेंबर या आठवडय़ात ७७ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली असली तरी प्रत्यक्षात खासगी दवाखाने व रुग्णालयांतील डेंग्यू रुग्णांची संख्या काही पटींनी अधिक असण्याची भीती आरोग्य विभागातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पालिकेनुसार सप्टेंबरमधील डेंग्यू रुग्णांची संख्या १६३ वर गेली असून त्यातील सर्वाधिक २७ रुग्ण भायखळ्यातील आहेत. २१ रुग्ण लालबाग-परेल, १० रुग्ण दादर, १२ रुग्ण भांडुप, तर ११ रुग्ण मुलुंडमध्ये आढळले आहेत. अंधेरी येथील ३६ वर्षीय महिलेचा १९ सप्टेंबर रोजी नायर पालिका रुग्णालयात मृत्यू झाला. याआधी ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला होता.
लेप्टोचाही एक मृत्यू
जुलै महिन्यात थैमान घातलेली लेप्टोची साथ आवाक्यात असली तरी विलेपार्ले येथील सुभाष रोडवरील २४ वर्षांच्या युवकाचा १५ सप्टेंबर रोजी केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. तो सहा दिवस केईएममध्ये दाखल होता, त्यापूर्वी त्याला ताप, कफ अशी लक्षणे दिसत होती.