१८ ते २६ वर्षे वयोगटांतील विद्यार्थ्यांमध्ये चिंताविकार जडण्याचे प्रमाण सन २००८ पासून जवळपास दुप्पट झाल्याचे एका अभ्यासात दिसून आले आहे. यासाठी वाढते आर्थिक ताणतणाव आणि डिजिटल साधनांवर अधिक वेळ घालवण्याची सवय कारणाभूत ठरत असावी, अशी शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

अमेरिकेतील कॅलिफोर्निया विद्यापीठातील (बर्कले) संशोधकांनी या विषयावर अभ्यास केला आहे. चिंताविकार जडल्याचे निदान झालेल्या किंवा या विकारावर उपचार घेतलेल्या अमेरिकेतील विद्यार्थ्यांची संख्या यासाठी लक्षात घेण्यात आली. देशात २००८ मध्ये हा विकार जडलेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण २००८ मध्ये १० टक्के होते. ते २०१८ मध्ये २० टक्क्यांवर गेल्याचे दिसून आल्याचे या संशोधनात म्हटले आहे. तृतीयपंथीय, लिंगनिश्चितीचा प्रश्न असलेल्या, लॅटिनवंशीय आणि कृष्णवर्णीय विद्यार्थ्यांमध्ये चिंताविकार वाढत जाण्याचे प्रमाण अधिक आढळले. हे विद्यार्थी पदवीच्या वर्गात जाईपर्यंत हा विकार वाढत गेल्याचे दिसून आले.

याबाबत कॅलिफोर्निया विद्यापीठाचे प्रा. रिचर्ड शेफ्लर यांनी सांगितले की, ही एक प्रकारची चिंताविकाराची नवी साथ आहे. विविध महाविद्यालयांतून मिळालेली या संबंधातली आकडेवारी त्याला पुष्टी देणारी आहे. मानसिक आजारांचा हा उद्रेकच असून त्याला आटोक्यात आणण्यासाठी देशस्तरावर मोठय़ा प्रमाणावर जनजागृतीची गरज आहे. हा अभ्यास केलेल्या संशोधकांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्यासंबंधीची देशपातळीवरील नऊ वर्षांतली माहिती तपासून आपले निष्कर्ष नोंदवले आहेत.