संताप व दु:ख या नकारात्मक भावना या प्रकृती ढासळत असल्याचे निदर्शक असतात, असा दावा एका संशोधनात करण्यात आला आहे.

अमेरिकेतील पेनसिल्वानिया विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे, की नकारात्मक भावनांनी शरीरातील जैवसंवेदक जास्त प्रमाणात उद्दीपित होऊन वेदनामय अनुभूती वाढत असते. नैराश्यामुळे प्रकृतीवर परिणाम होताना पेशींचा नाश होतो. सततच्या शारीरिक वेदना निर्माण होऊन हृदयरोग, मधुमेह व कर्करोग यांसारखे विकार बळावण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होते. ब्रेन, बिहॅवियर व इम्युनिटी या नियतकालिकात म्हटले आहे, की नकारात्मक भावनांचा शरीरावर परिणाम बघताना प्रामुख्याने शारीरिक वेदनांचा विचार केला जातो.

रोजच्या जीवनातील भावना व त्या अनुषंगाने होणारे शारीरिक त्रास या बाबतची माहिती विशिष्ट कालावधीसाठी नोंदवण्यात आली होती. त्यात व्यक्तींना स्वमूल्यमापन करण्यास सांगण्यात आले होते, अशी माहिती पेन स्टेट विद्यापीठाचे संशोधक जेनीफर ग्रॅहम एंजलँड यांनी दिली. त्यानंतर या व्यक्तींच्या रक्तातील संवेदकांची माहिती घेण्यात आली.  आठवडाभरातील नकारात्मक भावना व विचार यामुळे शरीरातील वेदना वाढलेल्या दिसून आल्या.

यात प्रश्नावली व तपासणी या दोन्ही तंत्रांचा वापर करण्यात आला असून, त्याच काळातील सकारात्मक भावना असलेल्या व्यक्तींमध्ये वेदनांचे प्रमाण कमी दिसून आले. हा प्रयोग पुरुषांवर करण्यात आला ही त्याची मर्यादा आहे.