21 October 2018

News Flash

कामानिमित्त अतिप्रवासामुळे नैराश्याचा धोका

२०१५ मध्ये १८,३२८ कर्मचाऱ्यांच्या आरोग्य मूल्यांकनांचा अभ्यास संशोधकांनी केला.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

कामानिमित्त अति प्रवास करणाऱ्या लोकांना चिंता आणि नैराश्याचा धोका अधिक असण्याची शक्यता असून, हे लोक व्यसनाच्या आहारी जाण्याची शक्यताही अधिक असल्याचा दावा एका अभ्यासात केला आहे. वारंवार कामानिमित्त प्रवास करणारे मद्यपानदेखील करीत असल्याचे संशोधकांना आढळून आले. जितका जास्त वेळ लोक कामानिमित्त घराबाहेर प्रवासासाठी जातात तेवढी त्यांची वर्तणूक आणि मानसिक आरोग्य ढासळत असल्याचे संशोधकांनी म्हटले.  कामानिमित्त प्रवासामुळे गैरसंसर्गजन्य रोगांचा आरोग्यावर काय परिणाम होतो याबाबात प्रथमच हा अभ्यास करण्यात आला आहे. कामानिमित्त प्रवास करणे हे नक्कीच आपल्या व्यावसायिक स्थैर्य आणि प्रगतीसाठी उत्तम मानले जाते, परंतु अतिप्रवासामुळे जीवनशैलीत होणारे बदलांमुळे विविध विकार जडण्याचा धोका असल्याचे समोर येत आहे, असे कोलंबिया विद्यापीठाचे सहयोगी प्राध्यापक अँड्रय़ू रुंडल यांनी म्हटले. ईएचई इंटरनॅशनलने दिलेल्या आकडय़ांवर हा अभ्यास आधारित आहे.  २०१५ मध्ये १८,३२८ कर्मचाऱ्यांच्या आरोग्य मूल्यांकनांचा अभ्यास संशोधकांनी केला. ईएचईकडून कर्मचाऱ्यांमधील नैराश्याची लक्षणे पडताळण्यासाठी प्रश्न विचारण्यात आले. त्याचबरोबर चिंता आणि मद्यपानाबाबत प्रश्न विचारण्यात आले. यातील २४ टक्के कर्मचाऱ्यांनी सामान्य चिंता विकाराच्या प्रश्नावलीत चारपेक्षा अधिक गुण मिळविले. तर १५ टक्के कर्मचाऱ्यांना आरोग्य प्रश्नावलीत चारहून अधिक गुण मिळाले. यानुसार या कर्मचाऱ्यांना सौम्य किंवा तीव्र चिंता आणि नैराश्याचा धोका असल्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे ६ टक्के कर्मचाऱ्यांना मद्यपानाची सवय असल्याचे आढळून आले. हा अभ्यास ऑक्युपेशन अ‍ॅण्ड इनव्हायर्न्मेंन्टल मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.

First Published on January 13, 2018 3:22 am

Web Title: depression risk due to huge journey for work