निरोगी आरोग्यासाठी दररोज आठ तासांची झोप आवश्यक आहे. परंतु जे लोक आठ तासांपेक्षा कमी वेळ झोप घेतात त्यांना नैराश्य आणि चिंता विकार होण्याचा धोका असल्याचा इशारा संशोधकांनी एका अभ्यासातून दिला आहे. प्रत्येकाच्या झोपेची वेळ आणि झोपेचा कालावधी आणि यादरम्यान होणारी नकारात्मक विचारांची पुनरावृत्ती (काळजी आणि चिंतन करणे)याचे मूल्यमापन अमेरिकेतील बिंगहॅमटन विद्यापीठातील संशोधकांनी केले. या अभ्यासात सहभागी झालेल्या लोकांच्या भावनिक प्रतिसादाला उत्तेजन देण्यासाठी काही छायाचित्रे दाखविण्यात आली. यावेळी संशोधकांनी सहभागी झालेल्यांच्या डोळय़ांच्या हालचालींवरून त्यांचे छायाचित्रांमधील कोणत्या भागाकडे लक्ष आहे हे टिपले. नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष न केल्याने झोपमोड होत असल्याचे संशोधकांना आढळले. अपुरी झोप हा नकारात्मक विचार डोक्यात राहण्याचाच एक भाग असून यामुळे लोकांच्या दैनंदिन जीवनात व्यत्यय येतो. अभ्यासात लोकांमध्ये सतत विचार करीत राहण्याची प्रवृत्ती असल्याचे आढळून आले. सतत नकारात्मक विचार केल्यामुळे त्यांना दाखविण्यात आलेल्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे त्यांना कठीण होते. असे बिंगहॅमटन विद्यापीठातील मेरिडिथ कोल्स यांनी म्हटले. काही लोक नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करून त्याबाबत विचार न करण्यास सक्षम असतात पण अभ्यासात सहभागी झालेल्यांना अशा प्रकारच्या नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करणे अडचणीचे असल्याचे समोर आले. असे कोल्स यांनी म्हटले. अशा प्रकारच्या नकारात्मक विचारांमुळे लोकांना नैराश्य, चिंता विकार अशा प्रकारचे मानसिक विकार होण्याचा धोका निर्माण होतो. डोक्यात सतत सुरू राहणारे नकारात्मक विचार नैराश्य, चिंता विकार आणि इतर गोष्टींशी संबंधित असतात. झोपमोड होणे आणि नकारात्मक विचारांकडे दुर्लक्ष होण्याच्या प्रक्रियांवर कसा परिणाम होतो याचे आम्ही अन्वेषण करीत आहोत असे कोल्स यांनी म्हटले. हा अभ्यास बिहेव्हिअर थेरेपी अ‍ॅण्ड एक्सपेरिमेन्टल सायकियाट्री या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे.