घाम, रक्त, मूत्र किंवा लाळेची तपासणी करून तणाव संप्रेरकांचे प्रमाण सहजपणे मोजता येईल, अशी एक नवी चाचणी शास्त्रज्ञांनी विकसित केली आहे. मानसिक ताण-तणाव हा ‘सायलेंट किलर’ म्हणजेच हळूहळू पण घातक परिणाम करणारा समजला जातो. कारण तणावामुळे होणारे परिणाम हे सहजासहजी लक्षात न येणारे आणि अनाकलनीयसुद्धा असतात. यात हृदयरोगांपासून ते मानसिक आजारांपर्यंतच्या समस्यांचा समावेश होतो.

तणाव तपासण्यासाठी केली जाणारी चाचणी एका साध्या-सरळ उपकरणाद्वारे आणि रुग्णाला अगदी घरबसल्या करता येईल, असा आशावाद अमेरिकेतील सिनसिनाटी विद्यापीठातील संशोधकांनी व्यक्त केला आहे.

याबाबत सिनसिनाटी विद्यापीठातील प्राध्यापक अन्ड्र स्टेकल यांनी सांगितले की, ‘तणावाची चाचणी घेण्यासाठीचे उपकरण साधे आणि वापरण्यास, समजण्यास सोपे असावे असा माझा प्रयत्न होता. यातून तुम्हाला सर्वच गोष्टींची माहिती मिळणार नाही. पण, तुम्हाला डॉक्टरकडे जाण्याची आवश्यकता आहे काय, इतपत जाणीव या चाचणीतून होऊ शकेल.’

या शास्त्रज्ञांनी असे एक उपकरण तयार केले आहे, जे तुमच्या रक्ताचा थेंब, घाम, लघवी किंवा लाळेचा थेंब यावर अतिनील किरणे सोडून तणाव संप्रेरकांची पातळी मोजू शकेल. शरीराच्या या सर्व द्रव्य घटकांमध्ये तणावाची पातळी दर्शविणारे जैविक घटक असतात. अर्थात त्यांचे प्रमाण वेगवेगळे असते, असे स्टेकल म्हणाले. हे उपकरण असा एक नाही, तर वेगवेगळे जैविक घटक मोजू शकतो. विभिन्न शारीर द्रवांसाठी त्याचा वापर होऊ शकतो, हे या उपकरणाचे वेगळेपण आहे.

या उपकरणाबाबतची माहिती ‘अमेरिकन केमिकल सोसायटी सेन्सर्स’च्या पत्रिकेत प्रसिद्ध झाली आहे. असे असले तरी हे उपकरण प्रयोगशाळेतील परिपूर्ण रक्त तपासण्यांना पर्याय ठरत नाही.