डॉ. शुभांगी महाजन
आपणास चेहऱ्यावरील तारुण्य पिटिकांचे (मुरुमांचे) डाग आणि खड्डय़ांपासून सुटका हवी असेल तर जाणून घ्या ‘डर्मारोलर ट्रीटमेंट’बद्दल.आपल्या चेहऱ्यावरील तारुण्य पिटिका (मुरूम) उपचारानंतर जातात. परंतु त्यानंतर चेहऱ्यावर डाग आणि खड्डे दिसतात. त्यामुळे सौंदर्यात बाधा निर्माण होते. अशा वेळी सौंदर्य खुलविण्यासाठी डर्मारोलर ट्रीटमेंट एक वरदानच!
डर्मारोलर म्हणजे काय?
डर्मारोलर हे एक छोटंसं रोलर असते. ज्याला अनेक छोटय़ा छोटय़ा सुया असतात. या सुयांना त्वचेत टोचून घेता येण्यासारखी रोलर हलक्या हाताने चेहऱ्यावर फिरवावे लागते. या सुयांची लांबी जेवढी जास्त तेवढी ती त्वचेत खोलवर जाते आणि तेवढा जास्त चांगला परिणाम दिसून येतो. डर्मारोलरचा उपयोग चेहरा, मान आणि टाळूवर करता येतो.
डर्मारोलरमुळे त्वचेत काय बदल होतो?
डर्मारोलरच्या सुया त्वचेच्या आत टोचल्या गेल्यामुळे त्या जागी त्वचा बरी होण्याची (हीलिंग) प्रक्रिया सुरू होते. ज्यात कोलेजन नामक घटक आणि रक्तप्रवाह वाढण्यास मदत होते. त्वचेतील रक्तप्रवाह वाढल्यामुळे आणि मोठय़ा प्रमाणात कोलेजन तयार झाल्यामुळे त्याजागी नवीन त्वचा तयार होते. त्यामुळे काळे डाग आणि खड्डे निघून जाण्यास मदत होते.
डर्मारोलर उपचार वेदनादायक आहे काय?
डर्मारोलरला अनेक सुया असल्यामुळे त्वचेवर फिरवताना त्या सुया टोचतात त्यामुळे वेदना होतात. परंतु वेदना कमी करण्यासाठी त्वचेवर क्रीम लावून त्वचा सुन्न करता येते.
डर्मारोलर उपचाराचे दुष्परिणाम
* जंतुसंसर्ग –
* व्हायरल इन्फेक्शन
* मुरूम फुटून जखमा होणे
* फोडांमध्ये पल्स तयार होणे
* डर्मारोलर योग्य पद्धतीने न हाताळल्यास चेहऱ्यावर काळे डाग आणि व्रण तयार होणे.
डर्मारोलर उपचार घेताना काय काळजी घ्यावी?
* डर्मारोलरचा उपयोग पुरेशी माहिती नसताना स्वत: करू नये.
* डर्मारोलर उपचार प्रशिक्षित ब्युटी, थेरपिस्ट, त्वचारोग तज्ज्ञ किंवा प्लास्टिक सर्जनकडून करावा.
* डर्मारोलरचा वापर पापण्या आणि ओठांवर करू नये.
* डर्मारोलरचा वापर हलक्या हाताने अधिक दाब न देता करणे आवश्यक असते.
* जर त्वचेवर काही अॅलर्जी झाली तर याचा वापर बंद करावा. उपचारानंतर त्वचेला बरे होण्यास १० -१५ दिवसांचा कालावधी देणे गरजेचे असते.
* चेहऱ्यावर मुरूम, फोड, जखम अथवा नागीन झालेली असल्यास डर्मारोलर ट्रीटमेंटचा वापर करू नये.
* एकच डर्मारोलर ‘पुन:पुन्हा वापरू नये. तीनपेक्षा अधिक वेळा डर्मारोलर वापरल्यास त्याच्या सुया बोथट होऊन चेहऱ्यावर व्रण आणि काळे डाग होऊ शकतात.
* डर्मारोलर वापरून झाल्यानंतर त्याला व्यवस्थित स्वच्छ करून घ्यावे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 21, 2020 1:47 am