‘जिंदगी न मिलेगी दोबारा’ या चित्रपटातील हृतिक रोशन, अभय देओल आणि फरहान अख्तर या त्रयींच्या संपूर्ण साहससफरीत त्यांच्यासोबत असलेली ‘बॅगवती’ आठवते का? शहामृगाच्या चामडीपासून बनवलेली ती अतिमहागडी बॅग अवघ्या सिनेमाभर तिन्ही मित्रांसोबत मूकपणे वावरते. पण तरीही ती आठवणींत राहाते ती तिच्या ‘स्टाइल स्टेटमेंट’मुळे. अशाच असंख्य ‘बॅगवती’ आपल्याला आजूबाजूला दिसतात. हँडबॅग, पर्स किंवा क्लच अशा कोणत्याही रूपात दिसणाऱ्या ‘बॅगवत्या’ हे स्त्रियांसाठी फॅशनचं अत्यावश्यक साधन बनलं आहे. त्यामुळे एकेकीकडे प्रत्येक रंगाच्या किंवा प्रकारच्या कपडय़ांवर शोभून दिसणाऱ्या बॅगचा ताफाच असतो..

हँडबॅग तशी स्त्रियांच्या जिव्हाळ्याची. अगदी आजच्या फॅशनेबल तरुणीच्या खांद्यावर रुळणारी टोटबॅग असो किंवा आजीच्या साडीत लपणारा बटवा, या हँडबॅगची रूपं वेगवेगळी पण प्रत्येकीसाठी गरजेची आणि तितकीच जिवाभावाची. कपडे, शूज, दागिने यांच्या निवडीबाबत प्रत्येकीची आवड, गरज, उपयुक्तता अशी वेगवेगळी कारणं असू शकतील, पण हँडबॅग मात्र प्रत्येकीला देखणी, स्टायलिश लागतेच. सणासुदीला खास पारंपरिक ड्रेससोबत घेतला जाणारा बटवा, खडय़ांचा क्लच आता मागे पडलाय आणि नव्या रूपातील, सुंदर हँडबॅग्स बाजारात आल्या आहेत.

एखाद्या स्त्रीच्या पर्समध्ये किती ऐवज दडवलेला असतो, याची खरंतर कुणी कल्पनाच करू शकत नाही. अगदी रोजच्या गरजेचा मोबाइल, चाव्या, रुमाल इथपासून मेकअपचं सामान, महिन्याभरापूर्वी प्रवास केलेल्या बसचं तिकीट, कधीतरी फेरीवाल्याकडून सहज घेतलेली आणि कधीही न वापरलेली क्लिप, कंटाळा आला तर तोंडात टाकायला आवळासुपारी, लिमलेटच्या गोळ्या, एक्स्पायरी डेट संपलेलं डिस्काऊंटचं कूपन आणि बरंच काही. त्यात भर म्हणून काही जणी त्यात जेवणाचा डबा, पाण्याची बाटली टाकून ऑफिसलासुद्धा जातात. त्यामुळे पर्स ही केवळ चैनेची गोष्ट न राहता जिवाभावाची सोबतीण असते. पण सणांच्या मोसमात हीच मोठाली पर्स काहीशी खुपते. साडी, सलवार सूटसोबत ती जुळून येते आणि पार्टीमध्ये इतकं मोठालं लटांबर घेऊन फिरणं नकोसं वाटतं. मग अशावेळी दोन लिपस्टिकच्या शेड्स, पैसे, आयलायनर, कंगवा, एखादं कानातलं इतकं गरजेपुरतं सामान राहणारी, छान नक्षीकाम केलेली, चारचौघीत उठून दिसणारी हँडबॅग हवी असते. सध्या बाजारात अशा बॅग्सची रेलचेल आहे.

वर्तुळाकार स्लिंग बॅग

आपल्या नेहमीच्या बॅग्सचा आकार शक्यतो चौकोनी, आयताकृती असतो. जास्तीत जास्त सामान राहण्याच्या दृष्टीने हा आकार सोयीचाही असतो. पण पार्टी, सणांच्या दिवसात आपल्याला सामानापेक्षा बॅगचा लूक जास्त महत्त्वाचा असतो. हे लक्षात घेऊन सध्या वर्तुळाकार आकाराच्या बॅग्स स्लिंज बाजारात आल्या आहेत. त्यांच्या लहान पण सुंदर आकाराने त्या भाव खातातच, पण वापरायलासुद्धा सोयीच्या असतात. या बॅग्सना लांब बेल्ट असतो, त्यामुळे खांद्यावर घेता येतातच, पण गरज नसल्यास बेल्ट काढून बॅग हातात मिरविता पण येते. वेगवेगळे रंग आणि सिंपल पॅटर्नच्या असल्याने तुम्ही या बॅग्स समारंभात वापरू शकताच पण शॉपिंग, गेट-टू-गेदरलासुद्धा सोयीच्या ठरतात. साधारणपणे ३०० रुपयांपासून यांच्या किमती सुरू होतात.

मेटॅलिक बॅग्स

प्रत्येक समारंभाला खडय़ांची कल्च शोभून दिसत नाही. कधीतरी सिंपल पण स्टायलिश ड्रेस घातला असेल, तर त्यासोबत ही कल्च जुळूनही येत नाही. अशावेळ पर्ससुद्धा सिंपल पण नजरेत भरणारी हवी असते. हेच लक्षात घेऊन सध्या बाजारात मेटॅलिक बॅग्स आल्या आहेत. यांचा आकार स्लिंज बॅग्सपेक्षा थोडा मोठा असतो पण पॅटर्न सिंपल असतो. गोल्ड, सिल्व्हर, अँटिक गोल्ड, कॉपर, शिमर रेड, मेटॅलिक ब्लॅक, धूपछाव व्हाइट अशा वेगवेगळ्या मेटॅलिक रंगांमध्ये या बॅग्स उपलब्ध आहेत. जास्त भडक नसल्याने पारंपरिक तसेच वेस्टर्न लूकसोबत सहज जुळून येतात. या बॅग्सच्या किमती ५०० रुपयांपासून सुरू होतात.

फ्रिंजेस बॅग

बोहो लूकच्या फ्रिंजेस बॅग्स सध्या ट्रेंडमध्ये आहेत. लेदर, रेक्झिनच्या या बॅग्सना खालच्या बाजूने ट्रेड्स, कापडाची झालर असते. हीच या बॅग्सची खरी गंमत आहे. स्लिंजपेक्षा आकाराने थोडय़ा मोठय़ा असल्याने एरवी ऑफिस किंवा फिरायला जातानाही या बॅग्स तुम्ही सहज वापरू शकता. या बॅग्सना मोठा बेल्ट असतो. त्यामुळे ट्रेन, बसने प्रवास करताना खांद्यावर बॅग अडकवून हात मोकळे ठेवता येतात. ५०० रुपयांपासून या बॅग्सच्या किमती सुरू होतात.

बॉक्स बॅग्स

हातात घेऊन फिरता येणारी, छोटी पण नजरेत भरणारी कल्च प्रत्येकीला समारंभासाठी हवीहवीशी वाटते. मध्यंतरी कुंदनकाम केलेल्या, आयताकृती कल्च बऱ्याच गाजल्या. याच कल्चचं नवं रूप म्हणजे बॉक्स कल्च. नावाप्रमाणेच चौकोनी किंवा आयताकृती असतात. या खास पार्टीवेअर असल्यामुळे यात बरेच प्रकार पाहायला मिळतात. मेटलच्या बारीक एम्ब्रॉयडरी केलेल्या, क्रिस्टल फिनिश, थ्रेड वर्क किंवा स्टोन वर्क केलेल्या असे बरेच प्रकार यात असतात. याच्या किमती एरवीच्या पर्सपेक्षा थोडय़ा जास्त असतात, पण तुमच्या प्रत्येक ड्रेसवर त्या खुलून दिसतात. त्यामुळे वेगवेगळ्या कार्यक्रमांना वापरू शकता. साधारणपणे १००० रुपयांपासून यांच्या किमती सुरू होतात.

कुठे मिळतील?

बांद्रा हिल रोड, लिंकिंग रोड, अंधेरी लोखंडवाला, मालाड मार्केटमध्ये या बॅग्स उपलब्ध आहेत. थोडे अधिक पैसे खर्च करण्याची तयारी असेल, तर मॉलमध्ये ब्रँडेड दुकानाची सफर नक्की करा.