स्तनाच्या कर्करोगाचे निदान वेगाने व कुठलाही स्पर्श न करताही अचूकपणे करण्यासाठी एक वेगळी पद्धत रोपड येथील आयआयटीच्या वैज्ञानिकांनी शोधून काढली आहे. या तंत्रात स्तनांपासून परावर्तित होणाऱ्या अवरक्त किरणांच्या मदतीने अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील कर्करोगाच्या गाठी शोधता येतात.

इन्फ्रारेड थर्मोग्राफी नावाचे हे तंत्रज्ञान वेदनारहित, वेगवान असून त्यात शरीराला छेदही द्यावा लागत नाही. ही पद्धत मॅमोग्राफी, अल्ट्रासाऊंड, मॅग्नेटिक रेझोनन्स (चुंबकीय सस्पंदन) या तंत्रांना पूरक आहे, असे विद्युत अभियांत्रिकी विभागाचे प्राध्यापक रवीबाबू मुलावीसाला यांनी सांगितले.

स्तनाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी मॅमोग्राफीचा वापर केला जात असला तरी त्याला मर्यादा आहेत. त्यात, दाट स्तनांमधील गाठी शोधणे अवघड असते.

दाट स्तनांमध्ये चरबी कमी व ग्रंथींच्या उती मांसल स्तनांपेक्षा जास्त असतात, त्यामुळे अशा परिस्थितीत मॅमोग्राफीला मर्यादा येतात. ग्रंथींच्या भागातील गाठी त्यात कळणे अवघड असते कारण ग्रंथी व गाठीचा भाग यातील घनतेत फरक असतो. मॅमोग्राफीत त्यामुळे गाठ ओळखणे अवघड होते. त्याऐवजी रेडिओलॉजी तंत्राने तेच काम सोपे व अचूक होते.

मुलावीसाला यांनी सांगितले की, मॅमोग्राफीत शरीर हानिकारक आयनीभवन असलेल्या प्रारणांना सामोरे जावे लागते. सध्याचे आयआरटी तंत्रज्ञान हे पारंपरिक मॅमोग्राफीपेक्षा रुग्णस्नेही आहे. या नवीन पद्धतीत औष्णिक प्रेरक स्तनांना लावला जातो व कक्ष तापमानापेक्षा दोन किंवा तीन अंश फरक असलेले तापमान स्तनाभोवती निर्माण केले जाते. यात औष्णिक लहरी स्तनात पसरल्या जातात व त्यातून त्वचेवरील तापमानातील फरक कळतो. त्यातून आत गाठ आहे की नाही हे अचूक समजते कारण या गाठींमुळे वरच्या तापमानात फरक पडत असतो.