मधुमेहावर उपचारांसाठी वापरले जाणारे एक औषध स्तनाच्या कर्करोगावर गुणकारी असल्याचे चिनी संशोधकांनी म्हटले आहे. किमान ७० हजार महिला चीनमध्ये दर वर्षी स्तनाच्या कर्करोगाने मरतात. ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर हा कर्करोगाचा प्रकार घातक असून त्याचे चार उपप्रकार आहेत, असे झेजियांग युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसीनचे डोंग शेनफांग यांनी सांगितले. या प्रकारचा कर्करोग लवकर पसरतो. मेंदू व फुप्फुसांनाही त्याची लागण होते. या प्रकारच्या स्तनाच्या कर्करोगावर सध्या प्रभावी उपचार नाहीत. डोंग व त्यांच्या सहकाऱ्यांनी म्हटले आहे की, चयापचयातील एकेआर १ बी १ हे विकर ट्रिपल निगेटिव्ह ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वाढते व त्यामुळे मेटॅस्टॅटिस प्रक्रियेचा वेग वाढतो व मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त असते. एपलरेस्टॅट नावाचे औषध एकेआर १ बी १ या विकराला रोखते. पण हे औषध जपानमध्ये मधुमेहावर वापरले जाते, त्याचा कर्करोगावरही उपचारात फायदा आहे. हे प्रयोग अजून पूर्ण झालेले नाहीत. एपालरेस्टॅटचा वापर करून कर्करोग बरा करता येतो या निष्कर्षांप्रत येण्यास अजून चाचण्यांची गरज आहे याबाबत सविस्तर लेख जर्नल ऑफ एक्सपिरिमेंटल मेडिसिन या नियतकालिकात प्रसिद्ध झाला आहे.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)