जागतिक आरोग्यदिन विशेष : आरोग्य संघटनेकडून चिंता
गेल्या ३५ वर्षांत मधुमेह असलेल्या प्रौढ रुग्णांची संख्या चौपट झाल्याचे स्पष्ट करीत जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) बुधवारी या रोगाबाबत चिंता व्यक्त केली. जगभरात मधुमेहाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होत असून, प्रत्येक ११ व्यक्तींमध्ये एक व्यक्ती मधुमेहाने ग्रस्त असल्याचे संघटनेने ताज्या अहवालात म्हटले आहे.
१९८० मध्ये मधुमेही रुग्णांची संख्या १०८ दशलक्ष होती. २०१४ मध्ये या आजाराच्या रुग्णांची संख्या ४२२ दशलक्ष झाली. म्हणजे या कालावधीत मधुमेहाच्या रुग्णांत ३१४ दशलक्ष इतकी वाढ झाली. कठोर पावले उचलली नाहीत तर भविष्यात मधुमेहाच्या रुग्णांत आणखी वाढ होणार असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
जगभरात मोठय़ा प्रमाणावर वाढत असलेला मधुमेह रोखणे आवश्यक आहे, असे आरोग्य संघटनेचे अधिकारी एटीन क्रूग यांनी सांगितले. विकसनशील देशांमधील नागरिक किंवा अल्प उत्पन्न गटातील नागरिकांना या रोगावर प्रभावी उपचार मिळणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले. मध्य पूर्वेत मधुमेहींच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. १९८० मध्ये मध्य-पूर्वेत मधुमेहाचे रुग्ण ५.९ टक्के होते. हे प्रमाण २०१४ मध्ये १३.७ टक्क्यांवर गेले आहे. ही वाढ प्रचंड आहे, असे डॉ. स्लीम स्लामा यांनी सांगितले.

* रक्तातील साखरेचे अतिप्रमाण हा आरोग्याला मोठा धोका आहे. जगात दरवर्षी अशा ३.७ दशलक्ष रुग्णांचा मृत्यू होतो, असे आरोग्य संघटनेच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
* अशा रुग्णांना हृदयाचा झटका येण्याचे प्रमाण तिपटीने वाढते. तसेच अशा रुग्णाचा पाय कापावा लागण्याची शक्यता २० पटीने वाढते.
* व्यायाम, योग्य व संतुलित आहार आणि वजन वाढू न देणे महत्त्वाचे आहे. प्रभावी उपचाराबरोबरच नागरिकांना योग्य आहाराचे पर्याय सरकारने उपलब्ध करून दिले पाहिजेत, असे डॉ. क्रूग यांनी सांगितले.