26 May 2020

News Flash

आरोग्य : डायलिसिसवरचा माझा प्रयोग

आयुर्वेदीक उपचार पद्धतीने डायलिसिसवर केलेल्या एका प्रयोगाची माहिती.

केंद्रीय अर्थसंकल्पात प्रत्येक जिल्ह्य़ात डायलेसिस केंद्रासाठी निधीची तरतूद केल्यानंतर एकंदरीतच डायलेसिसची तीव्रता जाणवू लागली. त्यानिमित्ताने आयुर्वेदीक उपचार पद्धतीने डायलिसिसवर केलेल्या एका प्रयोगाची माहिती.

खूप खूप वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.  पुणे मुक्कामी माझ्या दवाखान्यात सायंकाळी एक ख्रिश्चन तरुण गृहस्थ आले. ‘माझ्या वय वर्षे बारा असणाऱ्या मुलीला पुण्यातील रत्ना हॉस्पिटलमध्ये रोज डायलिसिस चालू आहे. आपणाकडे यावर काही इलाज होईल या आशेने मी आलो आहे.’ या मुलीला डायलिसिस चालू असूनही, दिवसाचे २४ तासांचे लघवीचे प्रमाण फक्त जेमतेम ८० मिली असल्याचे सांगितले. त्यांना कुणीतरी औषधोपचार बदलण्याचा पर्याय सुचवला होता. ते गृहस्थ खडकीत राहात होते. तेथील कोणा खडीवालेप्रेमी रुग्णमित्रांमुळे ते माझ्याकडे मोठय़ा आशेने आले होते. कारण रत्ना हॉस्पिटलमधील थोर तज्ज्ञ डॉक्टरांनी, ‘आमचेकडे फक्त डायलेसिस हाच एक उपाय आहे’ असे निक्षून सांगितले होते. लघवीचे प्रमाण अत्यल्प असल्याने मी थोडा अधिक विचार केला.

त्या गृहस्थांना घेऊन जवळच्या एका चुरमुरे, पोहे, लाह्य विकणाऱ्याकडे घेऊन गेलो. पाव किलो साळीच्या लाह्य घेऊन दिल्या. या खाऊन लघवीचे प्रमाणात काही वाढ होते का हे पाहावयास सांगितले. या मुलीच्या दुर्धर मूत्रपिंड विकारांत खूप पाणी पिऊन मूत्राचे प्रमाण वाढत असते असे माझे ठाम मत आहे. आपले मूत्रपिंड हे पाण्याचे जिवंत झरे असणाऱ्या विहिरीसारखे आहेत. त्यांनी आपले शरीरांत आपणहून मूत्रनिर्मिती करायची असते. असे त्यांचे प्रमुख कार्य आहे. दुसऱ्या दिवशी ते गृहस्थ दुपारी चार वाजता माझेकडे आले, म्हणाले, ‘‘अहो साळीच्या कोरडय़ा कोरडय़ा लाह्य दिल्यापासून वीस तासांत लघवीचे प्रमाण एकदम वाढले. २०० मिली झाले. सर्जन डॉक्टरही चकित झाले आहेत. तुम्ही मुलीला बघायला येता का?’’ मी त्यांचेसोबत हॉस्पिटलमध्ये लगेच गेलो. त्या वेळेस त्या मुलीला डायलिसिसनंतर एका ट्रॉलीवर झोपवून बाहेर आणत होते. तिला बघून मी त्या व्हरांडय़ातच तू नक्की बरी होशील असे तिच्या हातावर हात ठेवून सांगितले. आयुर्वेद शास्त्रानुसार रुग्णांकरिता ‘आश्वासन चिकित्सा’ अग्रक्रमाचे स्थानावर आहे. रत्नाचे थोर डॉक्टर म्हणाले, आमचेकडे याशिवाय दुसरा इलाज नाही. मी त्या गृहस्थांना मुलीला तडक घरी नेण्याचा सल्ला दिला. आयुर्वेदिक औषधी महासागरांत हजारो औषधीकल्प व सिरप दोन-अडीचशे अत्यंत उपयुक्त औषधी वनस्पतींचे योगदान सांगितले आहे. माझा ‘गोखरू’ या वनस्पतीवर प्रचंड प्रचंड विश्वास आहे, गोखरू ही एकमेव वनस्पती अशी आहे की जिच्या चूर्ण, गुग्गुळ व क्वाथ यांच्या वापराने मूत्रपिंडात आपोआप लघवी निर्माण होऊ लागते. पुनर्नवा या वनस्पतीच्या वापरानेही लघवीचे प्रमाण वाढते. पण त्या वनस्पतीचे कार्य वेगळ्या स्वरूपाचे आहे पुनर्नवाचूर्ण, पुनर्नवासन किंवा पुनर्नवा गुग्गुळ यांच्या वापराने शरीरांतील विविध अवयवांतील जलद्रव्याला मूत्रमार्गाला आणले जाऊन लघवीचे प्रमाण वाढते. शरीरांतील विविध अवयवांची सूज कमी होते. असो.

त्या मुलीकरिता मी लगेचच गुग्गुळ दोनशे मिलीगॅ्रमच्या सहा गोळ्या, रसायन चूर्ण तीन ग्रॅम व क्वाथ पंधरा मिली दोन वेळा किमान पाण्याबरोबर घ्यावयास सांगितले. कटाक्षाने मीठ पूर्णपणे वज्र्य करावयास सांगितले. शरीरांत चोवीस तासांत फक्त शंभर मिलीएवढेच पाणी औषधांबरोबर घेण्याचा सल्ला दिला. पाण्याशिवाय कोरडे कोरडे अन्न घ्यावयास सांगितले. त्या मुलीची एक किडणी- एक मूत्रमिंड जन्मापासूनच खराब, खूप सुकलेली असल्याचे शारीर तपासणीत निदर्शनास आले. या मुलीची प्रकृती शुक्लेंदूवत सुधारत गेली. ती इयत्ता आठवीतून उत्तम प्रकारे उत्तीर्ण होऊन दहावी, बारावी करत कॉलेजमध्ये गेली. या काळांत तिने काही काळ वर सांगितलेली तीन औषधे व शरीरात पुरेसे रक्ताचे हिमोग्लोबिनचे प्रमाण असावे म्हणून जादा औषध चंद्रप्रभा या गोळ्या घेतल्या. साधारण तीन महिने नियमित औषधे घेतली. पुढे तिचा विवाह झाला. ती मला मुंबईत पहिल्या अपत्यासह भेटली. हा खूप खूप आनंदाचा प्रसंग होता. या संपूर्ण मूत्रपिंड चिकित्सेतील यशाचा शंभर टक्के वाटा गोखरू या वनस्पतीकडेच जातो. त्यामुळे मी लगेचच ‘गोक्षुरं शरणं रक्षामि, माम रक्षतु गोक्षुर:।’ असा श्लोक केला.

या मुलीला मूत्रपिंडांना औषधे दिल्यानंतर गेल्या पस्तीस-चाळीस वर्षांत अशा विकाराकरिता माझेकडे काहीशे रुग्ण आले असतील. यांतील बहुसंख्य रुग्णांचे रक्ताचे प्रमाण तुलनेने कमी आहे असे रिपोर्ट्स असतात. सामान्यपणे या मूत्रपिंड विकार सदस्यांकरिता मी पुढील स्वरूपाची औषधे देतो. महिन्याभराने रक्ताचे रिपोर्ट्स काढायला सांगतो. लघवीचे प्रमाण दोन-चार दिवसांतच वाढले पाहिजे याकडे लक्ष देतो.  गुग्गुळ ९ किंवा १२ गोळ्या, सुवर्ण  चंद्रप्रभा, शृंग भस्म प्र., पुष्टिवटी १ गोळी व रसायन चूर्ण १ चमचा तीन ग्रॅम दोन वेळा घ्यावयास सांगतो.

जेवणानंतर आम्लपित्त टॅबलेट तीन गोळ्या बारीक करून घ्यावयास सांगतो. कटाक्षाने मीठ वज्र्य, बाहेरची जेवणे, मांसाहार, बेकरी पदार्थ, लोणची पापड पूर्णपणे बंद करावयाचा सल्ला देतो.

अशा मूत्रपिंड विकारांत रुग्णास मधुमेह असल्यास या रोगाचे निवारण व्हायला थोडे अधिक दिवस लागतात. वर सांगितलेल्या औषधांव्यतिरिक्त, मधुमेह हे औषध सकाळी व सायंकाळी ३ गोळ्या या हिशेबांत घ्यावयास सांगतो. कटाक्षाने बेलाची तीन त्रिदळे किंवा दहा छोटय़ा बेलाच्या पानांचा एक कप पाण्यात उकळून, आटवून अर्धा कप उदवून प्यावयास सांगतो. या अशा सविस्तर उपचारांनी दोन डायलेसिसमधील अंतर वाढते. रोज डायलेसिस करावे लागत असल्यास काही दिवसांनी एक दिवसाआड व नंतर आठवडय़ातून, पंधवडय़ातून एकदाच करावे लागते. बहुधा महिना-दीड महिन्यात डायलेसिस पूर्णपणे थांबते.

या काळात रुग्णाची लघवी भरपूर व्हायला हवी, त्याचबरोबर शरीरातील रक्ताचे प्रमाण व्यवस्थित राहिले पाहिजे यावर लक्ष देतो. शरीरावर कुठेही सूज येता कामा नये याकरिताही लक्ष ठेवायला लागते. याकरिता अशा रुग्णांना मीठ पूर्णपणे वज्र्य करावयास सांगतो. पूर्णपणे अळणी जेवणाचा सल्ला देतो. पाणी फार न पिता लघवीचे प्रमाण वाढले पाहिजे यावर लक्ष ठेवावे लागते. आहारामध्ये ज्वारीला प्राधान्य द्यावयास सांगतो.
वैद्य. प. य. खडीवाले वैद्य – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 11, 2016 1:28 am

Web Title: dialysis
टॅग Dialysis,Kidney
Next Stories
1 पालक राइस
2 अ‍ॅपल व पायनापल चाट
3 डेंग्यूविरोधात भारताने ब्राझिलचे अनुकरण करावे
Just Now!
X