‘सेव्ह दी चिल्ड्रन’ या बिगरशासकीय संस्थेने राबविलेल्या अतिसारप्रतिबंधक मोहिमेनंतर दिल्ली, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगाल या चार राज्यांत अतिसाराची लागण होण्याचे प्रमाण ६२ टक्क्यांनी कमी झाले आहे. संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब स्पष्ट झाली आहे.

या राज्यांतील अतिसाराच्या रुग्णांची पाहणी याच संस्थेद्वारे २०१४ मध्ये करण्यात आली होती. त्यानंतर राबविलेल्या प्रतिबंधक उपाययोजनांमुळे अतिसाराच्या रुग्णांचे प्रमाण ६२ टक्क्यांनी कमी झाल्याचे २०१८ मधील सर्वेक्षणात दिसून आले आहे. अतिसार नियंत्रणासाठी या संस्थेने सात कलमी कार्यक्रम राबविला आहे. या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, अतिसारप्रतिबंधक मोहिमेद्वारे सुमारे १६ रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले. अतिसार होऊ नये यासाठीच्या उपाययोजना तसेच रुग्णांवरील उपचार यामुळे या राज्यांत अतिसारामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण १५ टक्के कमी झाले आहे.

आरोग्य विभागाच्या सहायक आयुक्त (बाल आरोग्य) आरती गर्ग यांनी सांगितले की, अतिसार (डायरिया) आणि न्यूमोनिया यांमुळे होणाऱ्या मृत्यूंबाबत भारताचा जगात वरचा क्रमांक लागतो. भारतात पाच वर्षांखालील बालकांमधील मृत्यूंचा विचार करता नऊ टक्के मुलांचे मृत्यू हे केवळ अतिसारामुळे होतात. जगभरात अतिसारामुळे होणाऱ्या सुमारे चार लाख ८० हजार मृत्यूंपैकी एक लाख मृत्यू हे भारतात होतात. हे प्रमाण लक्षात घेता भारतात अतिसारामुळे तासाला दोन मृत्यू होतात. ‘सेव्ह दी चिल्ड्रन’ने राबविलेल्या मोहिमेतील उपचारांत जस्त आणि सहउपचारांत ओआरएस पाकिटांचा वापर महत्त्वपूर्ण ठरला. जागतिक आरोग्य संघटना आणि ‘युनिसेफ’च्या उपाययोजनात्मक कार्यक्रमाची ही चाचणी होती.