डॉ. अरुणा टिळक arunatilak@gmail.com

विमानामध्ये सर्वत्र सतत संचार करणाऱ्या, चपळ, चटपटीत हवाई सेविकांचा आहार बघू या. विमानामध्ये प्रवासाचे सामान, रॅकवरती उचलून ठेवणे, रॅकचे दरवाजे बंद करणे या कामांमुळे त्यांच्यामध्ये नेहमीच खांदेदुखी, पाठदुखी व सतत उभे राहिल्यामुळे कंबरदुखी होते. त्यामुळे पचनास जड असणारे पदार्थ खाऊ  नयेत. डय़ुटीवर जाताना त्यापूर्वी गॅस बनवणारे पदार्थ जसे की वाटाणा, छोले, अंडी टाळावेत. तेलकट पदार्थ, फास्टफूड, मैद्याचे पदार्थ, थंडगार पदार्थ, मिठाई खाणे टाळावे. यांमुळे वजन वाढून अतिरिक्त वजनाचा भार त्यांच्या गुडघा आणि पायांच्या सांध्यांवर येतो. त्यांनी तंदुरुस्त राहण्यासाठी वजन वाढू न देण्यावर लक्ष द्यावे. खारट पदार्थ (पॅक्ड फूड) टाळावे. कारण त्याने सांध्यांची सूज अधिक वाढते.

त्यासाठी त्यांनी हलका आहार घ्यावा. मुगाचा वापर करावा. मोड आलेल्या मेथीचा थोडय़ा प्रमाणात जरूर वापर करावा. जेव्हा त्यांना २-३ दिवस बाहेर राहावे लागते, तेव्हा घरी बनवलेले मेथीचे ठेपले, पराठे, तूप लावलेल्या पोळी-भाकरी, लसणाची अळशीची चटणीबरोबर घ्यावी. पाठदुखी, कंबरदुखी टाळण्यासाठी डिंकाचे, मेथीचे लाडू न्यावेत हे एनर्जी बारसारखे पण काम होते. टुना, सामन, सार्डिन यांसारखे मासे खावेत.

त्यांना पाळीच्या वेळी त्रास होणे किंवा बऱ्याच वेळा गर्भपात होण्याचे प्रमाण आढळते किंवा प्री-टर्म डिलिव्हरी होऊ  शकते. त्यांच्या गर्भाशयाच्या आरोग्यासाठी त्यांनी शतावरी, अळीव  व बडीशोप यांचा योग्य वापर करावा. दररोज रात्री पोटाला, ओटीपोटाला नारायण तेल, खोबरेल तेल हलक्या हाताने लावावे.त्यांच्या झोपेच्या वेळेचे गणित देशाबाहेर प्रवास करणे, रात्रपाळी, दिवसपाळी याने बदलते. कामावर असताना प्रवाशांचे काम, प्रवाशांच्या आरोग्याची जबाबदारी, अपघाताचे संभाव्य धोके यांमुळे त्यांच्या मनावर ताण असतो. त्यामुळे तणावजन्य व्याधी जसे की निद्रानाश, डिप्रेशन संभवते. तणावातून बाहेर पडण्यासाठी त्यांनी कामावर जाताना व झोपण्यापूर्वी ओम्कार जप व प्राणायाम करावा. रात्री तळपायाला बदाम तेल जरूर लावावे. रात्री तीनचार भिजवलेले बदाम खावेत. कॉफी टाळावी. पिंपल्स अ‍ॅलर्जीचाही त्रास होतो, त्यासाठी पुरेसे पाणी प्यावे. शक्य असेल तेव्हा ताजे अन्न खावे. साजूक तुपाचा वापर करावा. मौसमानुसार येणाऱ्या भाज्या व आवळ्याचा जरूर वापर करावा.