News Flash

बालकांच्या विकासासाठी आहार

मुलांच्या सर्वागीण विकासासाठी सुरुवातीपासूनच पोषक आहार देणे आवश्यक आहे.

कविता देवगण, आहार-पोषणतज्ज्ञ

मुलांच्या खाण्याच्या सवयींकडे गांभीर्याने पाहिले जाणे आवश्यक आहे. कारण व्यक्तीच्या खाण्याच्या बहुतांश सवयी बालपणातच लागतात आणि पुढे आयुष्यात कायम राहतात. बरीच मुले काही विशिष्ट पदार्थच खातात तर काही मुलांना काही पदार्थाची अ‍ॅलर्जी असते. त्यामुळे साहजिकच पालक त्यांना काही पदार्थ देणे टाळतात. मुलांच्या सर्वागीण विकासासाठी सुरुवातीपासूनच पोषक आहार देणे आवश्यक आहे.

प्रथिने- बहुतांश आहारामध्ये उत्तम दर्जाची प्रथिने आढळून येत नाहीत. प्रोसेस्ड फूड अर्थात ज्यांच्यावर प्रक्रिया करण्यात आल्या आहेत, असे अन्नपदार्थ आणि जंक फूडमध्ये प्रथिने कमी आणि रिफाइंड कबरेदके (कार्ब्स) व चरबी यांचे प्रमाण जास्त असते. असे अन्नपदार्थ खाणे मुलांच्या मेंदूच्या विकासासाठी हानीकारक ठरू शकते. मुलांच्या शरीराला पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळावीत यासाठी त्यांच्या दररोजच्या दोन वेळच्या जेवणामध्ये डाळीचा समावेश अवश्य करा. दररोज एकच डाळ, एकाच पद्धतीने शिजवण्याऐवजी वेगवेगळ्या डाळी, वेगवेगळ्या पद्धतीने वापरा, उदाहरणार्थ, बेसनाचा पोळा, वरण, आमटी, ढोकळा, मोड आणून उसळ, भाजी इत्यादी. पण हे करत असताना अनपॉलिश्ड डाळींचा वापर करणे खूप महत्त्वाचे आहे. तसेच या अनपॉलिश्ड डाळी विश्वसनीय विक्रेत्यांकडून खरेदी केलेल्या असाव्यात. जेणेकरून त्यामधील सर्व पोषकतत्त्वे तशीच कायम आहेत याची खात्री असेल. तुम्ही खूप व्यग्र किंवा घाईत असाल तरी मल्टीदाल चिला, मूंग दाल चिला आणि मल्टिग्रेन खिचडी यांसारखी रेडी-टू-कूक मिक्सेस तुम्हाला खूप उपयोगी ठरू शकतात. ही रेडी-टू-कूक मिक्सेस अतिशय काळजीपूर्वक तयार करण्यात आलेली आहेत, बनवायला अगदी सहजसोपी असून संपन्न आरोग्यासाठी आवश्यक सर्व पोषण यातून मिळते.

‘ब’ जीवनसत्त्व- मुलांच्या शरीराला ब जीवनसत्व पुरेशा प्रमाणात मिळत असल्यास त्यांची एकाग्रता, स्मरणशक्ती वाढते, ती कोणत्याही गोष्टीला चटकन प्रतिसाद देतात आणि त्यांची सुस्पष्ट विचार करण्याची मानसिक क्षमता वाढते. अख्खी धान्ये, अंडी, चरबी नसलेले किंवा चरबी कमी असलेले मांस, हिरव्या पालेभाज्या आणि वेगवेगळ्या डाळींपासून बनलेले पदार्थ, खासकरून जर तुम्ही शाकाहारी असाल तर नक्कीच, यांचा समावेश मुलांच्या दैनंदिन आहारामध्ये केला गेला पाहिजे.

लोह- लोह शरीरात इंधनाचे काम करते. शरीरातील पेशींपर्यंत आणि मेंदूपर्यंत प्राणवायू नेण्याच्या महत्त्वाच्या कामात लोह मदत करते. जेव्हा शरीरात लोहाचे प्रमाण कमी होते तेव्हा पेशींना प्राणवायूची कमतरता भासू लागते, अशक्तपणा येतो, स्मरणशक्ती, एकाग्रता मंदावते, निरुत्साही वाटते आणि परिणामी कामातील, अभ्यासातील कामगिरी खालावते. त्यामुळे मुलांच्या दररोजच्या आहारात पुरेशा प्रमाणात लोह असले पाहिजे.  बेसन, अंडी, शेंगदाणे, बिया, शेंगा आणि खासकरून चणे यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात असते.

आयोडीन- मुलांच्या मेंदूच्या आणि शरीराच्या विकासासाठी त्यांना दररोज पुरेशा प्रमाणात आयोडीन मिळणे अत्यावश्यक आहे. लहान वयात मुलांच्या शरीराला मिळणारी पोषकतत्त्वे त्यांच्या मेंदूच्या संपूर्ण विकासात मोलाची भूमिका बजावत असतात.  आयोडीन पुरेशा प्रमाणात मिळत राहिल्याने मुलांचा मानसिक विकास योग्य प्रकारे होतो, त्यांची बुद्धी तल्लख बनते. त्यामुळे आयोडीनला अजिबात विसरू नका. मासे, अंडी आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये आयोडीन असते. पण आपण रोज जेवणात वापरतो ते आयोडाइज्ड मीठ हा पुरेशा प्रमाणात दररोज आयोडीन देण्याचा उत्तम आणि सहजसोपा मार्ग आहे. त्यामुळे तुमचे मूल फक्त काही विशिष्ट पदार्थाचा हट्ट धरत असेल किंवा त्याला कशाची अ‍ॅलर्जी असली तर दररोजच्या जेवणात आयोडाइज्ड मिठाचा वापर करून तुम्ही त्याला रोजच्या रोज पुरेशा प्रमाणात आयोडीन देऊ  शकता.

स्मार्ट स्नॅक्स

सर्वगुणसंपन्न आरोग्यासाठी स्मार्ट स्नॅक्स खूप मोलाची भूमिका बजावतात. छोटय़ा भुकेच्या वेळेस त्यांना बदाम, अक्रोड, काजू, चिलगोजे खाण्याची सवय लावा. त्यांना या सगळ्यांच्या चवींची ओळख करवून द्या. हा सुका मेवा खाण्याची सवय जितक्या लहानपणापासून लावाल, तितके उत्तम कारण या चवींची आवड निर्माण व्हायला वेळ लागू शकतो. लक्षात ठेवा, सुका मेवा खाण्याची एक सवय त्यांची रोगप्रतिकारशक्ती खूप मोठय़ा प्रमाणावर सशक्त बनवू शकते. अजून एक चांगली सवय म्हणजे दर दिवशी दोन फळे खाणे, शिवाय दररोज वेगवेगळी फळे द्या. यामुळे त्यांच्या शरीरातील अँटिऑक्सिडंट्स वाढतात, यामुळे त्यांना मोठे झाल्यावर मधुमेह, हृदयरोग इत्यादींपासून संरक्षण मिळते, शिवाय अ‍ॅलर्जीपासूनही बचाव होऊ  शकतो. अँटिऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असलेल्या आहारामुळे पेशींचे संरक्षण होते आणि स्मरणशक्ती तल्लख राहते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 16, 2020 3:10 am

Web Title: diet for boys development foods for the growing child zws 70
Next Stories
1 सौंदर्यभान : मायक्रोडमीब्रॅझन
2 आयुर्उपचार : नस्य
3 संधिवात असणाऱ्यांसाठी किवी ठरेल वरदान; जाणून घ्या फायदे
Just Now!
X