रात्री निद्राधीन व्हायच्या आधी जास्त वेळ टीव्ही पाहणे किंवा संगणक-मोबाइलवर विविध खेळ खेळणे याचा युवावर्गाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का? तर, होतो, असा रूढ समज असला तरी, तो तितकासा बरोबर नसल्याचा दावा करणारे संशोधन आता पुढे आले आहे. व्यक्तीच्या मानसिक आरोग्याशी या गोष्टीचा तसा थेट परिणाम होत नसावा, असे शास्त्रज्ञांनी म्हटले आहे.

टीव्ही-मोबाइलवर घालवलेला वेळ आणि युवकांचे मानसिक आरोग्य याचा संबंध असल्याचे फरक कमी प्रमाणात दिसूून आल्याचा दावा ‘सायकॉलॉजिकल सायन्स’ या पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या अभ्यासात करण्यात आला आहे. १७ हजार किशोरवयीन मुला-मुलींची पाहणी करून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

याबाबत इंग्लंडमधील ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिटय़ूटमधील संशोधक अ‍ॅमी ओरबेन यांनी सांगितले की, किशोरवयीन मुलांच्या मानसिक आरोग्यावर त्यांनी डिजिटल स्क्रीनवर घालवलेला वेळेचा विपरीत परिणाम होतो काय, याची पाहणी केली असता आम्हाला त्यात फारसे तथ्य दिसून आले नाही. या पाहणीसाठी आम्ही संख्याशास्त्र आणि पद्धत तंत्राच्या उत्कृष्ट पर्यायांचा अवलंब केला. टीव्ही-मोबाइल आदी स्क्रीनचा वापर आणि किशोरवयीन मुलांचे आरोग्य याचा संबंध समजून घेण्यासाठी मानसशास्त्र हे उपयुक्त माध्यम असले तरी या डिजिटल तंत्रज्ञानाविषयीच्या समस्यांबाबत ते अनेकदा समर्पक स्पष्टीकरण देऊ शकत नाही, असे त्या म्हणाल्या.

ऑक्सफर्ड इंटरनेट इन्स्टिटय़ूटचे संशोधन विभागाचे संचालक अ‍ॅन्ड्रय़ू प्रझिबिल्स्की म्हणाले की, तीन वेगवेगळ्या गटांतील माहितीचे विश्लेषण केल्यावर आम्ही या निष्कर्षांला आलो की,  किशोरवयीन मुलांनी ‘स्क्रीन’वर वेळ घालवल्यामुळे त्यांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होतो असे अत्यल्प प्रमाणात दिसून आले.