सतत मोबाइल वापरल्याने लहान मुलांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर परिणाम होताना दिसत आहे. यासंदर्भातील अनेक दावे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांकडून केले जातात. असं असतानाच आता बालकल्याण आणि मुलांसंदर्भातील विषयांवर जगभरामध्ये काम करणाऱ्या युनिसेफ (युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन इमर्जन्सी फंड) या संस्थेने पालकांना मुलांकडून होणाऱ्या मोबाइलच्या अतीवापरासंदर्भात इशारा दिला आहे. मुलं मोबाइल वापरत असताना पालकांनी त्यांच्या सोबत बाजूला बसणं गरजेचं आहे असं युनिसेफने म्हटलं आहे. तसेच मुलांनी अर्ध्या तासाहून अधिक काळ मोबाइलचा वापर करु नये असंही युनिसेफने म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन पोस्ट करण्यात आली आहे.

दिवसोंदिवस लहान मुलांनी मोबाइल वापरण्याचा प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. याचे गंभीर परिणामही समोर येत आहेत. स्क्रीनवर सतत काहीतरी पाहत राहण्याच्या सवयीमुळे मुलांना भाषा आणि संवाद कौशल्य निर्माण होण्यासंदर्भातील अडचणींचा समाना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे. भारतामध्येही मोबाइल, लॅपटॉप, टॅबलेट यासारख्या गोष्टींच्या अती वापरामुळे मुलांना आरोग्य विषयक अनेक समस्यांना लहान वयातच तोंड द्यावे लागत आहे. सतत स्क्रीनसमोर राहिल्याने मुलांच्या मानसिक आणि शरीरिक विकासावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे. सतत टीव्ही, मोबाइल, लॅपटॉप यासारख्या गोष्टींच्या समोर बसून मुल तासन् तास स्क्रीनकडे पाहत असल्याने लहान वयातच त्यांना अनेक आजार होत असल्याचे निरिक्षणांमधून समोर आलं आहे.

अनेक संशोधन आणि सर्वेक्षणामध्ये मुलं मोबाइल आणि टीव्हीसमोर खूप वेळ घालवत असल्याचे उघड झालं आहे. अशा मुलांच्या कल्पनाशक्तीवर परिणाम होत असल्याचेही काही संशोधनांमधून समोर आलं आहे. यामुळे मुलांच्या मानसिक विकासावर परिणाम होत आहे. त्यामुळेच मोबाइलच्या व्यसनापासून मुलांना दूर ठेवणे गरजेचे आहे.

एकीकडे मोबाइलसारख्या गोष्टींच्या माध्यमातून मुलं नवनवीन गोष्टी शिकतात आणि पाहत असतात. तर दुसरीकडे या शिकणाऱ्या गोष्टींपेक्षा मनोरंजनाशी संबंधित गोष्टीं पाहण्याकडे मुलांचा अधिक कल असतो. अनेक मुलं कार्टून, गेम यासारख्या गोष्टींमध्ये बराच वेळ घालवतात. त्यामुळेच मोबाइलच्या अती वापरापासून मुलांना दूर ठेवणं गरजेचं आहे असं तज्ज्ञ सांगतात.

मोबाइलच्या अती वापराने मुलांना खांदे, मान, पाठदुखीशी संबंधित आजार होण्याची शक्यता असल्याचे बालविकार तज्ज्ञ सांगतात. याचबरोबर लहान वयामध्येच चष्मा लागतो आणि दृष्टीसंदर्भातील इतरही समस्या निर्माण होतात. त्यामुळेच मुलांना तंत्रज्ञानामपासून म्हणजेच मोबाइल, टीव्ही, लॅपटॉपपासून दूर ठेवण्यासाठी त्यांना इतर बैठे खेळ, गप्पा मारणे, घरातील काम यासंदर्भातील गोष्टींमध्ये गुंतवून ठेवणे अधिक फायद्याचे ठरते असं तज्ज्ञ सांगतात.