वैज्ञानिकांनी साधारण इंकजेट प्रिंटर वापरून कमी खर्चात रोगनिदान करणारी चिप तयार केली असून त्याच्या मदतीने कर्करोगासह अनेक रोगांचे निदान शक्य आहे. जगातील विकसनशील देशांत त्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकणार आहेत. ‘लॅब ऑन चिप’ असे या उपकरणाचे स्वरूप असून त्याची किंमत एका चिपला एक सेंट एवढी आहे. यातील नवीन तंत्रज्ञानामुळे वैद्यकीय निदानात मोठी क्रांती होणार आहे. कमी किमतीतील जिनोम सिक्वेन्सिंगने झाली तशीच ही क्रांती असेल, असे स्टॅनफर्डचे प्राध्यापक रॉन डेव्हिस यांनी सांगितले. सिक्वेन्सिंग तंत्रज्ञानात गाठीतील डीएनएचे सिक्वेन्सिंग व उत्परिवर्तन ओळखता येते व व्यक्तीविशिष्ट औषधयोजना करता येते. त्याच पद्धतीने लॅब ऑन चिप पद्धतीत कर्करोग विकसित होण्याच्या आधीच ओळखता येतो. कर्करोग गाठीतील पेशी रक्तात फिरत असतानाच त्या ओळखल्या जातात. रोगनिदानात अजूनही फारशी प्रगती नसल्याने कर्करोगात वाचण्याचे प्रमाण कमी उत्पन्न गटात ४० टक्के आहे; त्यातही विकसनशील देशात ते आणखी जास्त आहे. मलेरिया, क्षय, एचआयव्ही यात मृत्यूचे प्रमाणही अधिक आहे. स्वस्त निदान पद्धतीने यात फरक पडेल अशा विश्वास रहीम एसफानदारपोर यांनी व्यक्त केला आहे. मायक्रोफ्लुइड्स, इलेक्ट्रॉनिक व इंकजेट तंत्रज्ञान यामुळे दोन भागांत ही चिप विकसित केली आहे. त्यात पहिल्या भागात सिलिकोन मायक्रोफ्लुइडिक चेंबर असते, त्यात पेशी घेतल्या जातात व त्याच भागात फेरवापराची इलेक्ट्रॉनिक चिप असते. दुसऱ्या भागात इंकजेट प्रिंटरने इलेक्ट्रॉनिक पट्टी पॉलिस्टरवर छापली जाते. ही एक चिप तयार करायला वीस मिनिटे लागतात.