22 October 2019

News Flash

तंतुमय आहारामुळे रोगांना प्रतिबंध

न्यूझीलंडमधील ओटागो विद्यापीठातील संशोधकांनी ही माहिती दिली.

ज्यांच्या आहारात तंतुमय पदार्थ आणि अख्ख्या धान्याचे प्रमाण अधिक असते, त्यांना संसर्गजन्य रोग होण्याची शक्यता कमी असते, असे ‘लॅन्सेट जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या अभ्यास अहवालांच्या आढाव्यातून दिसून येते.

न्यूझीलंडमधील ओटागो विद्यापीठातील संशोधकांनी ही माहिती दिली. दिवसात किमान २५ ते २९ ग्रॅम किंवा त्याहून अधिक तंतुमय आहार घेणाऱ्यांना आरोग्यविषयक लाभ झाल्याचे गेल्या ४० वर्षांत झालेले विविध अभ्यास आणि वैद्यकीय चाचण्यांतून दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.

तंतुमय आहाराचे अधिक प्रमाणात सेवन करणाऱ्यांची हे पदार्थ कमी प्रमाणात खाणाऱ्यांशी तुलना करण्यात आली. त्यानुसार, तंतुमय आहार चांगल्या प्रमाणात घेणाऱ्यांत त्याच्या अभावामुळे तसेच हृदयाशी संबंधित रोगांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण १५ ते ३० टक्के कमी झाल्याचे दिसून आले.

तंतुमय पदार्थाचे चांगले प्रमाण असलेल्या आहारामुळे हृदयाच्या धमन्यांचे रोग, पक्षाघात, दुसऱ्या प्रकारचा मधुमेह आणि पचनसंस्थेचा कर्करोग होण्याचे प्रमाण १६ ते २४ टक्क्यांनी कमी झाल्याचे दिसून येते. या अभ्यासात पाहणी केलेल्या दर एक हजार व्यक्तींमध्ये तंतुमय आहारामुळे मृत्यूचे प्रमाण १३ ने कमी झाले, तर हृदयाच्या रक्तवाहिन्यांचे रोग होण्याचे प्रमाण सहाने कमी झाले. याशिवाय आहारात तंतुमय आहाराचे प्रमाण वाढवल्यास वजनात घट होऊन कोलेस्टेरॉलचे प्रमाणही तुलनेत कमी होते. जागतिक पातळीवर विचार केल्यास बहुतांश लोकांच्या आहारातील तंतुमय पदार्थाचे प्रमाण हे दिवसाला २० ग्रॅमपेक्षाही कमी असल्याचे संशोधकांनी सांगितले.

First Published on January 12, 2019 12:34 am

Web Title: disease prevention due to fibrous diet