दिवाळी म्हटलं की घरात गोडाचे पदार्थ आलेच. करंजी, लाडू, शंकरपाळ्या, शेव, अनारसे आणि बरचं काही. पण जर याहूनही काही वेगळा पदार्थ तुम्हाला घरी आलेल्या पाहुण्यांसाठी तयार करायचा असेल तर ‘खजूर नी पॅटीस’ ही गोड, तिखट अशी पाककृती नक्की करून पाहा. खास दिवळीनिमित्त ‘खानदानी राजधानी’चे शेफ महाराज जोधाराम चौधरी यांनी ही पाककृती तयार केली आहे. यातलं बरंच साहित्य दिवाळीत आपल्या घरी उपलब्ध असतंच तेव्हा पाहुयात ‘खजूर नी पॅटीस’ची पाककृती.

साहित्य :
– अर्धा किलो उकडलेले बटाटे
– २० ग्रॅम आरारूट
– बारीक चिरलेली हिरवी मिरची (चवीनुसार)
– मीठ (चवीनुसार)
-सर्व साहित्य एकजीव करून बाजूला ठेवून द्यावे.
-पॅटीस तळण्यासाठी तेल

पॅटीसच्या सारणासाठी लागणारं साहित्य :
– एक लहान वाटी खजूर बारीक चिरून
– बारीक चिरलेले १० ते १२ काजू
– बारीक चिरलेले १० ते १२ मनुके
– डाळींबाचे दाणे
– अर्धा टी स्पून वेलची पावडर
– १ चमचा तूप
– २० ग्रॅम मावा

कृती:
एका कढाईमध्ये तूप गरम करून घ्यावे. त्यात खजूर, काजू, मनूके घालून खरपूस परतवून घ्यावे. नंतर मावा घालावा. वरून डाळींबाचे दाणे घालून हे मिश्रण मंद आचेवर परतवून घ्यावे. त्यानंतर वेचली पावडर टाकावी हे सारं मिश्रण एकजीव करून घ्यावं त्यानंतर ते थंड करून घ्यावं.

बटाट्याच्या एकजीव केलेल्या मिश्रणाचे गोळे करावे. यात थंड झालेलं सारण भरून घ्यावं. गरम तेलात हे पॅटीस तळून घ्यावे. पुदीन्याच्या चटणीसोबत हे पॅटीस छान लागतात. हे पॅटीस शॅलो फ्राय करूनही तुम्ही खावू शकता.