भारतात पोळी-भाजी किंवा भात-वरण हे मुख्य अन्न आहे. तर परदेशात ब्रेड आणि त्याचे पदार्थ हाच मुख्य आहार म्हणून घेतला जातो. या ब्रेडमध्येही परदेशात अनेक प्रकार पहायला मिळतात. कधी ऑम्लेटसोबत तर कधी सॅलेडसोबत ब्रेड नियमित खाल्ला जातो. आता या ब्रेडची किंमत सामान्यपणे किती असेल असा प्रश्न तुम्हाला कधी पडला आहे का? खरं तर भारतीय चलनामध्ये ४० ते ५० रुपयांना अगदी महाग म्हणजे ७० ते ८० रुपयांना ब्रेडचा एक पॅक मिळतो. मात्र परदेशातील याची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच अवाक व्हाल. त्यातही ब्रेड सर्वात महाग मिळण्याचे ठिकाण ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल.

दक्षिण कोरियाची राजधानी सेऊलमध्ये ब्रेड सगळ्यात महाग मिळतो. कॉस्ट ऑफ लिव्हींगने दिलेल्या अहवालानुसार, सेऊलमधील लोक एक किलो ब्रेड खरेदी करण्यासाठी १५.६ डॉलर म्हणजेच जवळपास १०१४ रुपये द्यावे लागतात. आता या रकमेत भारतात १३ ते १४ किलो ब्रेड खरेदी करता येईल. या देशांचे राहणीमान महाग असल्याने ही किंमत इतकी जास्त असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. तर दक्षिण कोरियाबरोबरच आणखी कोणत्या देशात ब्रेडची किंमत काय आहे हेही समजून घेणे औत्सुक्याचे आहे.

देशांनुसार १ किलो ब्रेडच्या किंमती

जिनिवा    ६.५ डॉलर (४२२ रुपये)

पॅरिस      ६.३ डॉलर (४०९ रुपये)

ओस्लो     ५.५ डॉलर (३५७ रुपये)

ज्यूरिक     ५.३ डॉलर (३४४ रुपये)

तेल अवीव   ५.१ डॉलर (३३१ रुपये)

हाँगकाँग   ४.६ डॉलर (२२९ रुपये)

दिल्ली   १.१ डॉलर (७१ रुपये)