– डॉ. लक्ष्मण जेस्सानी

करोना मुळे संपूर्ण जगभरात आरोग्याला अभूतपूर्व धोका निर्माण झाला आहे. जगातील विविध देशांमध्ये जवळपास २ मिलियन आणि भारतात १३३८७ लोकांना याची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे आणि या साथीला नियंत्रणात ठेवण्याच्या मार्गातील सर्वात मोठे आव्हान म्हणजे कोरोना वरील उपचारांसाठी विशिष्ट थेरपी किंवा हा आजार होऊ नये यासाठी लस उपलब्ध नाही. नॉवेल करोना विषाणूच्या संसर्गाच्या विरोधात शरीराची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी उपचार आणि लस यासाठी विशिष्ट अँटिव्हायरल एजन्ट शोधण्यासाठी जगभरातील आणि भारतातील डॉक्टर्स, संशोधक आणि फार्मा कंपन्या अथक प्रयत्न करत आहेत.

सार्स, मेर्स आणि एच१ एन१ यांच्या उपचारात यशस्वी ठरलेल्या कोन्व्हलेसेन्ट प्लाज्मा थेरपी (सीपीटी) कडे काही संशोधक व अभ्यासक आशेने पाहत आहेत. जवळपास शतकभर आधी स्पॅनिश फ्लू साथीने जेव्हा संपूर्ण जगाला ग्रासले होते तेव्हा रोगातून बऱ्या झालेल्या व्यक्तींच्या रक्तातील घटकांचे ट्रान्सफ्युजन करण्यात आल्याने गंभीर आजारी रुग्णांचा मृत्युदर कमी करण्यात मदत मिळाली. कोन्व्हलेसेन्ट प्लाज्मा थेरपीमध्ये संसर्गातून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी दान केलेल्या रक्त प्लाज्मा वापरल्या जातात. आजारातून नुकत्याच बऱ्या झालेल्या कोन्व्हलेसेन्ट दात्याच्या प्लाज्मामध्ये आजाराचे कारण असलेल्या पॅथोजेन विरोधात लढू शकतील अशा अँटीबॉडीज मोठ्या प्रमाणावर असतात. जेव्हा हा कोन्व्हलेसेन्ट प्लाज्मा तोच आजार झालेल्या दुसऱ्या रुग्णाच्या शरीरात ट्रान्सफ्युज केला जातो तेव्हा त्यामुळे त्या रुग्णाच्या शरीरात त्या रोगाचा प्रतिकार करणारी शक्ती तातडीने निर्माण होते.

कोरोना मधील उपचारांसाठी सीपीटीच्या वापरासंदर्भात जगभरात करण्यात आलेल्या अभ्यासातून आशादायक निष्कर्ष आढळून आले आहेत. गेल्या महिन्यात प्रकाशित करण्यात आलेल्या जर्नल ऑफ द अमेरिकन मेडिकल असोसिएशन (जेएएमए) मध्ये नमूद करण्यात आल्यावर संशोधकांना आढळून आले आहे की, कोरोना विषाणू आणि एआरडीएस (अक्यूट रेस्पिरेटरी डिस्ट्रेस सिंड्रोम) यांनी गंभीर आजारी असलेल्या पाच रुग्णांमध्ये सीपीटीमुळे ‘क्लिनिकल स्थितीमध्ये सुधारणा’ घडून आली. प्रोसिडिंग्स ऑफ द नॅशनल अकॅडेमी ऑफ सायन्सेस (पीएनएएस) ने ६ एप्रिल रोजी प्रकाशित केलेल्या अभ्यास अहवालातूनही कोरोना विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांवर सीपीटी वापरामुळे पॉजिटीव्ह परिणाम दिसून आल्याचे सांगितले गेले आहे. ह्युस्टनमधील कोरोनाने गंभीर आजारी असलेल्या तीन भारतीय-अमेरिकन रुग्णांमध्ये देखील या आजारातून बऱ्या झालेल्या रुग्णांचे (रक्त)प्लाज्मा ट्रान्सफ्युज केल्यानंतर तब्येत सुधारत असल्याची लक्षणे दिसली आहेत.

अनेक क्लिनिकल चाचण्यांच्या निष्कर्षांची घोषणा होत असल्यामुळे या थेरपीबाबतची उत्सुकता वाढली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) ने या थेरपीला प्रमाणित केले जाण्यासाठी संशोधन मंडळांकडून अभ्यासासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. मुंबईतील दोन आघाडीची महानगरपालिका रुग्णालये कस्तुरबा रुग्णालय आणि नायर रुग्णालयातील गंभीर आजारी रुग्णांवर क्लिनिकल चाचण्या घेतल्या जातील. या चाचण्यांमध्ये कोरोना कोन्व्हलेसेन्ट प्लाज्मा ज्यामध्ये सार्स-सीओव्ही-२ विषाणूचा प्रतिकार करू शकणाऱ्या अँटीबॉडीज आहेत त्याची सुरक्षितता आणि सक्षमता यांची पडताळणी केली जाईल. या क्लिनिकल चाचण्यांसाठी आपले प्लाज्मा दान करण्यासाठी कोरोना मधून यशस्वीरीत्या बऱ्या झालेल्या व्यक्तींनी तयारी दर्शवली आहे.

त्यामुळे आता सीपीटी ही कोरोना ने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांसाठी नवी आशा ठरेल का? संशोधन आणि चाचण्यांमधून याचे उत्तर लवकरच मिळेल.

( लेखक कन्सल्टन्ट, इन्फेक्शियस डिसीजेस, अपोलो रुग्णालय, नवी मुंबई आहेत. )