आहार हा आरोग्यातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आहार चांगला असेल तर तब्येत चांगली राहण्यास मदत होते. मात्र आहाराचे गणित बिघडले की आरोग्याच्या तक्रारी सुरु होतात. आहारात कोणत्या गोष्टींचा समावेश करावा याबाबत आपण अनेकदा ऐकतो आणि वाचतो. मात्र असे काही पदार्थ आहेत जे एकत्रित खाल्ल्यास ते आरोग्यासाठी हानिकारक असतात. वेगाने आणि हळूहळू पचणा-या खाद्यपदार्थांना एकत्र खाल्‍याने या समस्‍या येतात. याचे कारण म्‍हणजे एक पदार्थ लवकर पचतात तर दुसऱ्या पदार्थाची प्रक्रिया सुरु असते. यामुळे शरीरातील काही क्रियांमध्ये अडथळा निर्माण होतो आणि पचनक्रिया बिघडते. आता असे कोणते पदार्थ आहेत जे एकत्र खाल्ल्यास त्रास होऊ शकतो पाहूयात…

दूध आणि केळं

शिकरण म्हणून हा पदार्थ आवडीने खाल्ला जातो. मात्र हे दोन पदार्थ एकत्र खाणे तोट्याचे आहे. हे दोन्‍ही पदार्थ एकमेकांना पचण्‍यापासून रोखतात. दोघांची पचण्‍याची वेळ वेगवेगळी आहे. यांना नेहमी एकत्र खाल्‍याने शरीराची अन्‍न पचण्‍याची प्रक्रीया बदलते आणि रात्री नीट झोप न लागण्‍याची समस्‍याही उद्भवू शकते.

काकडी आणि टोमॅटो

सॅलेड म्‍हणून आपण अनेकदा काकडी आणि टोमॅटो एकत्रित खातो. मात्र यामुळे पोटांचे आजार होऊ शकतात. हे दोन सॅलाड एकत्रित खाल्ल्यास गॅस, ब्‍लोटिंग, पोटदुखी, थकवा, अस्‍वस्‍थ वाटणे अशा समस्‍या उद्भवू शकतात.

ब्रेड आणि नूडल्‍ससोबत ज्‍यूस

ब्रेड आणि नूडल्‍सना एकत्र खाल्‍ल्‍याने ते महत्‍त्‍वाच्‍या एंजाइमला नष्‍ट करतात. त्यामुळे शरीराचे अनेक त्रास उद्भवतात. म्हणून हे एकत्र खाणे आरोग्याच्यादृष्टीने घातक आहे.

टरबूज आणि खरबूज

उन्हाळ्यात साधारण ही दोन्ही फळे मुबलक प्रमाणात उपलब्ध असतात. याशिवाय सध्या बाहेरही फ्रूटडीशमध्ये ही दोन्‍ही फळे एकत्रित खाल्‍याने अपचन आणि पोटाच्‍या इतर समस्‍या उद्भवू शकतात. त्‍यामुळे हे पदार्थ सोबत खाणे टाळलेलेच बरे.

(ही बातमी संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता ऑनलाइन’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)