16 December 2017

News Flash

पदार्थांतील तेल निथळण्यासाठी वर्तमानपत्र वापरताय?

'या' गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे

लोकसत्ता ऑनलाइन | Updated: October 4, 2017 11:00 AM

गणपती आणि नवरात्रोत्सवानंतर आता सगळ्यांना वेध लागले आहेत ते दिवाळीचे. ‘दिवाळी सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ असे म्हणत आपण या सणाचे अतिशय आनंदाने स्वागत करतो. हा सण म्हणजे आतशबाजी, रांगोळी, फराळ आणि दिव्यांचा सण. दिवाळी अवघ्या काही दिवसांवर आली असून, घराघरात फराळाचे पदार्थ तयार करण्याची तयारी सुरू झाली असेल. दिवाळीच्या दिवसांमध्ये चकली, करंजी, शंकरपाळे, अनारसे इत्यादी चविष्ट पदार्थांची रेलचेल असते. यातील बहुतांश पदार्थ हे तळलेले असल्याने त्यांच्यात तेलाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे तेल टिपण्यासाठी वर्तमानपत्रांचा वापर केला जातो. मात्र वर्तमानपत्रासाठी वापरली जाणीर शाई आरोग्याला अत्यंत धोकादायक असते. ही शाई पोटात गेल्यास कॅन्सरचा धोका वाढतो असे संशोधनातून समोर आले आहे.
काय धोका असू शकतो…

– मासिके किंवा वर्तमानपत्रामधील शाई तेलकट पदार्थांमध्ये सहज शोषली जाते. शाईमधील ग्रॅफाईट हा घटक घातक असल्याने यामुळे कॅन्सरचा धोका उद्भवण्याची शक्यता जास्त असते.

– शरीरातील विषारी घटक मूत्रविसर्जनातून किंवा शौचातून बाहेर पडतात परंतु ग्रॅफाईट शरीरात साचून राहतो. त्याचा परिणाम किडनी आणि फुफ्फुसांवर होतो.

– वर्तमानपत्राच्या शाईतील सॉल्वंट्स पचनक्रियेत बिघाड करते. तसेच हार्मोन्सचे संतुलन बिघडविते. परिणामी कॅन्सरचा धोका वाढतो.

– वर्तमानपत्रापेक्षा मासिकाचा कागद जाड तसेच ग्लॉसी असतो. त्यामुळे तो तेल निथळण्यासाठी जास्त चांगला असे आपल्याला वाटते. परंतु हा गैरसमज आहे. कागद अधिक ग्लॉसी बनवण्यासाठी तसेच शाई स्प्रेड होऊ नये म्हणून वापरले जाणारे घटक आरोग्यासाठी अधिक धोकादायक असतात.

– तेलकट पदार्थांमधील अतिरिक्त तेल शोषून घेण्यासाठी टीश्यू पेपर किंवा पेपर टॉवेलचा वापर करा.

– टिश्यू पेपर अथवा पेपर टॉवेल घाऊक बाजारातून विकत घेतल्यास फार महाग पडत नाहीत. मात्र तुम्हाला कागदाचाच वापर करायचा असल्यास किमान छपाई न केलेला कोरा कागद वापरा.

First Published on October 4, 2017 11:00 am

Web Title: dont use newspaper for oily food products risky for health