करोना महामारीमुळं जगभरात करोडो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. भारतही यातून सुटलेला नाही. भारतात संघटित आणि असंघटित क्षेत्रातील लाखो लोकांना नोकऱ्या गमवाव्या लागल्या आहेत. यामुळे त्यांच्या उपजीविकेवर संकट आलं आहे. त्यामुळे सहाजिकच देशभरात नोकऱ्या शोधणाऱ्यांचे प्रमाणही आता वाढले आहे. प्रोफेशनल नेटवर्किंग साईट लिंक्डइनवर (LinkedIn) वरुन याचा अंदाज लावता येईल. या सोशल मीडिया साईटवर गेल्या सहा महिन्यांत नोकरी शोधणाऱ्यांची संख्या दुप्पट झाली आहे. मनी कन्ट्रोलने याबाबत वृत्त दिलं आहे.

लिंक्डइनने म्हटलं की, भारतात प्रत्येक सेक्टरमध्ये नोकरी शोधणाऱ्यांची संख्या दुपट्टीपेक्षा अधिक झाली आहे. मग ते उत्पादन क्षेत्र असो किंवा सेवा क्षेत्र. कंपनीने म्हटलंय की त्यांच्या प्लॅटफॉर्मवर पोस्ट केलेल्या प्रत्येक नोकरीसाठी जून महिन्यांत सरासरी १८० लोकांनी अर्ज केले होते. तर याच वर्षी जानेवारीत एका नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या ९० पेक्षाही कमी होती.

कंपनीने सांगितले की, बाजारात आता जितक्या नोकऱ्या उपलब्ध आहेत. त्यापेक्षा कितीतरी अधिक नोकरीसाठी अर्ज करणाऱ्यांची संख्या आहे. म्हणजेच पुरवठ्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात मागणी आहे. त्यामुळे गेल्या सहा महिन्यांत लिंक्डइनवर नोकरी शोधणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. कंपनीने आपल्या स्टेटमेंटमध्ये म्हटलं की, मार्चच्या शेवटच्या आठवड्यात देशभरात लॉकडाउन घोषित झाल्यानंतर लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या, कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात झाली. यानंतरच नोकऱ्यांच्या मागणीत वाढ झाली आहे.

नोकऱ्या मिळण्याचे प्रमाण सध्या केवळ १५ टक्के

लिंक्डइनने म्हटलं, आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून एप्रिल ते जुलैदरम्यान नोकरी मिळालेल्या लोकांच्या संख्येत ३५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. ही वाढ महत्वाची आहे कारण, करोनामुळं कंपन्यांकडून कार्मचारी भरतीचे प्रमाण खूपच कमी झाले आहे. सध्या भरतीचे प्रमाण केवळ १५ टक्के आहे ही चिंतेची बाब आहे. जर ही परिस्थिती लवकर सुधारली नाही तर बेरोजगारीचं संकट आणखी गहरं होईल.

तर सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमीच्या (सीएमआयई) माहितीनुसार, देशात रोजगाराची स्थिती ठीक होत आहे. एप्रिलमध्ये जिथे बेरोजगारीचा दर २४ टक्के होता तो जुलैमध्ये ८ टक्क्यांवर आला. भारतात LinkedIn चे ६.९ कोटींपेक्षा अधिक अॅक्टिव युजर्स आहेत. तर जगभरातील पाच कोटी कंपन्या या फ्लॅटफॉर्मशी जोडल्या गेल्या आहेत.