आता मोबाइल, लॅपटॉप, यांसारखे इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा अगदी नोटा आणि कागद देखील सॅनिटाइझ करता येणार आहेत. भारताच्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने (DRDO) एक नवीन डिव्हाइस विकसित केले आहे.

‘डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर’ (DRUVS) असे या डिव्हाइसला नाव देण्यात आले आहे. संरक्षण मंत्रालयाने निवेदनाद्वारे रविवारी याबाबत माहिती दिली. या डिव्हाइसमुळे संपर्कात न येता इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स किंवा अगदी नोटा आणि कागद देखील सॅनिटाइझ होऊ शकतात. मशिनच्या आतमध्ये ठेवलेल्या वस्तूला 360 डिग्रीमध्ये अतिनील किरण प्रदान होतात. प्रॉक्सिमिटी सेन्सर स्विच ड्रॉवर ओपनिंग आणि क्लोजिंग यंत्रणेमुळे संपर्काशिवाय ऑटोमॅटिक पद्धतीने हे उपकरण काम करतं. एकदा मशिनमधील वस्तूची निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मशिन आपोआप बंद(स्लीप मोड) होते.

‘डिफेन्स रिसर्च अल्ट्राव्हायोलेट सॅनिटायझर’ची निर्मिती विशेषतः मोबाइल फोन, आयपॅड, लॅपटॉप, चलन नोटा, चेक, चालान, पासबुक, कागद, लिफाफे इत्यादींच्या निर्जंतुकीकरणासाठी केली गेली आहे, असे संरक्षण मंत्रालयाद्वारे सांगण्यात आले.