News Flash

स्पिन्स्टर्स पार्टीचं फनफुल ड्रेसिंग

लग्नाच्या मोसमात स्पिन्स्टर्स पार्टीसाठी हॉटेल्स बुकिंग व्हायला सुरुवात होते

संगीत, रिसेप्शनइतकाच स्पिन्स्टर्स पार्टी हाही लग्नातील महत्त्वाचा भाग बनू लागला आहे.

घरात लग्न ठरलं की इकडे आई-वडिलांची तयारीची झुंबड उडते तर तिकडे मुलींमध्ये स्पिन्स्टर्स पार्टीचे बेत शिजायला लागतात. चला तर मग, आपणही स्पिन्स्टर्स पार्टीच्या तयारीला लागू या..

‘गर्ल्स, फायनली ठरलं. पुढच्या महिन्यात साखरपुडा आणि दोन महिन्यात लग्न.’
व्हॉट्सअप ग्रुपवर अचानक एक दिवस एक जण घोषणा करते. तिच्यावर शुभेच्छांचा वर्षांव होतच असतो, तितक्यात एक जण पटकन म्हणते, ‘आता स्पिन्स्टर्स पार्टी हवी.’
‘हो, स्पिन्स्टर्स पार्टी करायचीच. लग्नाआधी एक मस्त ब्रेक हवाच. चला प्लान करा. कुठे जायचं, काय काय धमाल करायची,’ एकदा हा हिरवा कंदील मिळताच पार्टीच्या तयारीला अख्खा ग्रुप जुंपतो. ‘ए ड्रेसकोड आधीच ठरवा हा.. तशी शॉपिंगची तयारी करायला.’
लग्नाची तारीख ठरली, की घरात सगळेच तयारीला लागतात. साडय़ा, दागिने, मंडप, केटिरग, हॉल सगळ्याची धावपळ सुरू होते. पण या सगळ्या गोंधळात एकीकडे मित्रमैत्रिणींच्या गटामध्ये वेगळेच बेत शिजत असतात. लग्नाआधी एखाद्या छान हॉटेलमध्ये किंवा कोणाच्या घरी नाइटआउटच्या निमित्ताने मस्त स्पिन्स्टर्स पार्टी साजरी करण्याचा. त्यात मंडळ जास्तच उत्साही असले, तर एक छोटी गोवा ट्रिपसुद्धा उरकते.
लग्नाच्या मोसमात हल्ली लग्नाच्या हॉल्सच्या बुकिंग इतकंच स्पिन्स्टर्स पार्टीसाठी हॉटेल्समध्येही बुकिंग व्हायला सुरुवात होते. संगीत, रिसेप्शनइतकाच स्पिन्स्टर्स पार्टी हाही लग्नातील महत्त्वाचा भाग बनू लागला आहे. केवळ मित्रांची एक पार्टी या पलीकडे स्पिन्स्टर्स पार्टीचं स्वरूप थोडसं विस्तारलेलं असतं. चमचमीत खाण्यापिण्याची सोय, ग्रुपमधल्या एखाद्याचं लग्न झालेलं असेल, तर त्याचे उपदेशाचे चार बोल, भूतकाळाची उजळणी, नाचगाणी, दंगामस्तीमध्ये अख्खी रात्र जाते. आतापर्यंत एखाद्याच्या घरात कधी तरी घाईघाईने ठरविल्या जाणाऱ्या या स्पिन्स्टर्स पार्टीजना आता मस्त इव्हेंटचं स्वरूप मिळालं आहे. त्यामुळे लग्नासोबतच वेडिंग प्लॅनर्स या पार्टीजसुद्धा आयोजन करून देतात. अगदी डेस्टिनेशन वेडिंग करणारी जोडपीसुद्धा लग्नाचे कार्यक्रम सुरू होण्याआधी ही पार्टी उरकून घेतात. साहजिकच इतर समारंभांप्रमाणे या पार्टीजसाठीही ड्रेसकोड ठरविले जातात. पण इतर पार्टीजच्या तुलनेत या ड्रेसकोडमध्ये थोडी गंमत असते. कित्येकदा या पार्टीजचं खास फोटोशूट होतं, त्यामुळे या पार्टीजचा ड्रेसकोड फोकसमध्ये असतो. साहजिकच त्याचं नियोजनसुद्धा व्यवस्थित पुरेसा वेळ घेऊन केलं जातं. अगदी फॅन्सी ड्रेसेसपासून पर्सनलाइज कपडय़ांपर्यंत वेगवेगळे प्रयोग यानिमित्ताने केले जातात.

स्पिन्स्टर्स पार्टीज सहसा रात्री असतात. त्यामुळे कपडे निवडताना अंधारात उठून दिसतील, फोटोजमध्ये व्यवस्थित दिसतील असे रंग निवडा. तसंच तुमची पार्टी कुठे आहे, तिथले लाइट्स कसे आहेत, हेही पाहायला हवं. नाही तर अपुऱ्या प्रकाशात फोटो चांगले येत नाहीत आणि फजिती होते. त्यामुळेच स्पिन्स्टर्स पार्टीमध्ये मुख्यत्वे पांढऱ्या रंगाला पसंती दिली जाते. तसंच मेटॅलिक, फ्लोरोसंट रंग आवर्जून वापरले जातात. शक्यतो मुलींच्या गटात हॉट पिंक आणि मुलांमध्ये ब्ल्यू रंग प्रामुख्याने वापरतात. पण त्याशिवाय तुम्ही वेगवेगळे बोल्ड शेड्स वापरू शकता. कपडय़ांचा रंग ठरविताना पहिल्यांदा नवरामुलगा किंवा मुलगी यांचे कपडे ब्राइट रंगाचे आणि इतरांपेक्षा वेगळे असू द्यात. मेटॅलिक गोल्ड, सिल्व्हर आणि काळा रंग, नारंगी आणि पांढरा, लाल आणि पांढरा, काळा आणि पांढरा, लेमन यलो आणि काळा, मेटॅलिक ब्ल्यू आणि पांढरा अशी कॉन्ट्रास कॉम्बिनेशन्स आवर्जून वापरा. पण त्याच वेळी दोन कॉन्ट्रास रंग एकमेकांना मारकही ठरणार नाहीत याचीही काळजी घ्या. स्ट्राइप्स, प्रिंट्स वापरूनही तुम्ही ड्रेसेसचा कॉन्ट्रास मिळवू शकता.

रंगासोबतचे कपडय़ांचे पॅटर्न निवडण्याची कसरतसुद्धा महत्त्वाची असते. मुलांच्या पार्टीत शक्यतो टी-शर्ट, जीन्स, ब्लेझर असतात, त्यामुळे त्यांना फारसा फरक पडत नाही. पण मुलींच्या मैत्रिणींच्या गटात सगळ्याच जणी एकाच शरीरयष्टीच्या नसतात. मिनी स्कर्टसारखा प्रकार सगळ्यांनाच साजेसा दिसेल असं नाही. एखादीची उंची कमी असेल, तर मॅक्सी ड्रेसमध्ये ती ग्रुपमध्ये अजूनच लहान दिसेल. पार्टीला ठरेल त्या प्रकारचा ड्रेस प्रत्येकीकडे असेलच असं नाही, अशा वेळी नव्या ड्रेसवर खर्च करायची तयारीही लागते. त्यामुळे प्रत्येकीला साजेसा ड्रेस निवडणं गरजेचं असतं. वन पीस ड्रेस या पार्टीजना आवर्जून घालतात. पण त्याचबरोबर जम्पसूट, प्लिटेड स्कर्ट आणि क्रॉप टॉप, टय़ुल स्कर्ट, हॉट पॅण्ट आणि टय़ुनिक असे प्रकारही ट्राय करू शकता. ही पार्टी नवं भन्नाट ड्रेसिंग करून पाहण्याची छान संधी असते. न जाणो त्यातून इतके दिवस तुम्ही कधीच ट्राय न केलेला ड्रेसचा प्रकार आवडू लागेल. त्यामुळे ड्रेसिंगचे हटके प्रकार आवर्जून करा. अर्थात रात्रभराचा दंगा, डान्स सगळं लक्षात घेता ड्रेसिंग सुटसुटीत असेल, याचीही तितकीच काळजी घ्या. ज्वेलरी फारशी न वापरणंच उत्तम. उलट अशा पार्टीज्ना ब्रायडल श्ॉश, ओव्हरसाइज गॉगल, बनी बॅण्ड, मिकी हॅट, क्राऊन असे हटके प्रॉप्स वापरले जातात. तुमचा लुक ज्वेलराइज असेल तर हे प्रॉप्स लपून जातील.
साधारणपणे मुलींच्या पार्टीमध्ये फेमिनीन, एलिगंट लुक असतो. त्यामुळे बलून स्कर्ट, शॉर्ट गाऊन, सिक्वेन्स लेगिंग किंवा जॅकेट, फ्लोरल ड्रेस वापरू शकता. अर्थात पार्टीसाठी सगळ्यांना एकाच प्रकारचा ड्रेस घेण्याचा हट्ट करू नका. एखाद वेळेस बाजारात तो ड्रेस सगळ्या साइजमध्ये असेलच असं नाही. बरं प्रत्येकीचा बजेटचा प्रश्नही असतोच. त्याऐवजी ड्रेसमध्ये एक समान दुवा ठेवा. सगळ्यांसाठी एक रंग कॉमन ठेवा किंवा चेक्स, स्ट्राइप्स असे प्रकार समान ठेवता येतील. ब्ल्यू जीन्स, ब्लॅक स्कर्ट, गंजी असे शक्यतो सगळ्यांकडे सहसा उपलब्ध असतील किंवा विकत घेतल्यास पार्टीनंतर वाया जाणार नाहीत असे कपडय़ांचे प्रकार निवडा.

सध्या या पार्टीजमध्ये पर्सनलाइज कपडे, प्रॉप्स वापरण्याचा ट्रेण्ड चालू आहे. त्यामध्ये गमतीशीर कोट्स, नवऱ्या मुलीची आणि मैत्रिणींची नावं लिहिलेली टी-शर्ट्स, हुडीज, ड्रेस, गंजी पसंत केले जातात. तसेच ब्राइडल श्ॉश, लडकीवाले लिहिलेले बॅजेस, नावांचे नेकपीस वापरले जातात. तशा ब्राइड्समेड, मेड ऑफ ऑनर, बेस्टमॅन या पाश्चात्त्य लग्नांमधील संकल्पना आहेत. पण या पार्टीजमध्ये मित्रमैत्रिणींना आवर्जून ही बिरुदं दिली जातात. त्यानुसार त्यांच्या टी-शर्ट किंवा बॅजेसवर प्रिंटिंग केलं जातं. असं आहे हे सगळं. चला मग यंदा तुमच्या ग्रुपमधील लग्नाळूंच्या स्पिन्स्टर्स पार्टीच्या तयारीला लागा.

सौजन्य :  लोकप्रभा

response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 16, 2017 10:26 am

Web Title: dresses for spinster party
Next Stories
1 शीतपेय, पिझ्झामुळे लहान मुलांना यकृताचे आजार
2 Valentines Day 2017 : ‘व्हॅलेंटाईन वीक’ अजूनही सुरू आहेच की!
3 ‘Nokia 3310’ होणार रिलाँच?
Just Now!
X