दररोज तीन कप कॉफी प्यायल्यामुळे यकृताचा कर्करोग होण्याचा पन्नास टक्क्यांपर्यंत धोका टळत असल्याचे नुकत्याच करण्यातआलेल्या एका अभ्यासामधून समोर आले आहे.
कॉफी प्यायल्यामुळे यकृताला सामान्यपणे होणाऱ्या अभिस्तर(एचसीसी) कर्करोगाचा धोका देखील चाळीस टक्क्यांपर्यंत कमी होत असल्याचा दावा या अभ्यासावर काम करणाऱ्या संशोधकांनी केला आहे. हा अभ्यास अमेरिकन गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी सोसायटीचे नियतकालीक ‘क्लिनिकल गॅस्ट्रोएन्ट्रोलॉजी अँड हिपॅटोलॉजी’मध्ये प्रसिध्द करण्यात आला आहे.
यकृताचा कर्करोग हा जगामधील सामान्यपणे होणाऱ्या कर्करोगांपैकी सहावा आहे. कर्करोगामुळे मृत्यू होणाऱ्या रोग्यांमध्ये यकृताच्या कर्करोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. ‘एचसीसी’ हा यकृताला होणारा प्रमुख कर्करोग आहे. संपूर्ण जगाचा विचार केल्यास एकूण कर्करोग्यांमध्ये ९० टक्के कर्क रोगी हे यकृताचे कर्करोगाने ग्रस्त आहेत.    
“कॉफी आरोग्यासाठी आणि मुख्यत्वे यकृतासाठी चांगली असल्याच्या या यापूर्वीच्या दाव्यांना आमच्या संशोधनाने दुजोरा दिला आहे,”  असे या संशोधनावर कामकरणारे संशोधक कार्लोला वेशिआ म्हणाले.   
कॉफीमुळे मधुमेह टळतो व पुढे होणारे धोके टळतात. परिणामी, यकृताच्या कर्करोगाला धोका टळतो. असे मिलान विद्यापीठाच्या क्लिनिकल सायन्स अँड कम्यूनिटी हेल्थ विभागाचे संशोधक मारीओ नेगरी म्हणाले.