मानवी आरोग्यावर होणारे मद्यपानाचे दुष्परिणाम लक्षात घेता जगभरातच सन २०२५ पर्यंत मद्यपानाचे प्रमाण १० टक्क्यांनी कमी करण्याचे लक्ष्य जागतिक आरोग्य संघटनेने ठेवले आहे. पण, ते साध्य होण्याची कोणतीही शक्यता दिसत नसून, उलट भविष्यकाळातही मद्यपानामुळे होणारे वाढते आजार, व्याधी यांचे आव्हान कायम राहणार आहे, असे भाकीत या क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविले आहे.

याबाबतचा अभ्यास ‘लॅन्सेट जर्नल’ या पत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. यामध्ये १९९० ते २०१७ या कालावधीत १८९ देशांमध्ये मद्यपानाचे प्रमाण किती होते, याचा आढावा घेतला आहे. त्यानुसार, या कालावधीत जगभरातील वार्षिक मद्यपानाचे प्रमाण हे सुमारे ७० टक्क्यांनी वाढले आहे.

भारतामध्ये २०१० ते २०१७ या कालावधीत मद्याच्या सेवनात झालेली वार्षिक वाढ ही ३८ टक्क्यांपर्यंत पोहोचते. त्यामुळे जगभरात मद्याचे घातक परिणाम कमी करण्यासाठी निर्धारित करण्यात आलेले लक्ष्य गाठण्याची वाट बिकट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

भारतापुरता विचार करायचा झाल्यास २०१० मध्ये येथे एक प्रौढ मद्यपी वर्षांला सरासरी ४.३ लिटर मद्य प्राशन करीत असे. हे प्रमाण २०१७ मध्ये प्रति मद्यपी सरासरी ५.९ लिटर मद्य इतके वाढले होते, अशी माहिती जर्मनीतील ‘टीयू ड्रसडेन’मधील संशोधकांनी दिली. याच कालावधीत अमेरिकेतील दर माणशी सरासरी मद्यपानातही ९.३ लिटरहून ९.८ लिटर इतकी अल्प वाढ झाली. चीनमध्ये याच कालावधीत हे प्रमाण ७.१ पासून ७.४ लिटपर्यंत वाढले.

मद्यपानाची वाढती आवड आणि वाढती लोकसंख्या यामुळे जगभरातील एकूण वार्षिक मद्यसेवनात ११९०च्या २० हजार ९९९ दशलक्ष लिटरवरून २०१७ मधील ३५ हजार ६७६ दशलक्ष लिटपर्यंत वाढ झाली, असे संशोधकांनी सांगितले. २०३० पर्यंत जगभरातील निम्म्या प्रौढ व्यक्ती मद्यपान करणाऱ्या असतील आणि किमान २३ टक्के लोक महिन्यातून एकदा तरी मद्य घेणारे असतील, असे भाकीत टीयू ड्रसडेनचे संशोधक जेकब मॅन्थे यांनी वर्तविले आहे.