जीवनरक्षक लसी कमी व मध्यम उत्पन्नाच्या देशातील लोकांना देण्यासाठी ड्रोन विमानांचा वापर करणे शक्य होणार आहे, त्यामुळे पैसाही वाचेल व लसीकरणाचा वेगही वाढणार आहे, असे सांगण्यात आले.
संशोधकांच्या मते रस्त्यांवरील कोंडी व इतर अडचणी यामुळे लसी पोहोचवताना अनेक अडचणी येतात व त्यात इंधनाचा अपव्यय होतोच शिवाय वाहनांच्या निगा दुरुस्तीवर खर्च होतो. त्याचबरोबर लसी सुरक्षित ठेवणे हे आव्हान असते. जॉन हॉपकिन्स ब्लूमबर्ग स्कूल ऑफ पब्लिक हेल्थ या संस्थेचे ब्रुस ली यांनी सांगितले, की जीवनरक्षक लसींसाठी कमी व मध्यम उत्पन्न गटातील लोकांना संघर्ष करावा लागतो. हेपॅटॅटिस बी, टिटॅनस (धनुर्वात), मीझल्स (गोवर) व रोटाव्हायरस, डेंग्यू, मलेरिया व झिका यांसारख्या लसींचा वापर आगामी काळात जास्त होणार आहे. लसी दोन ते चार ठिकाणी साठवून त्या हव्या तिथे पाठवणे हे एक आव्हान आहे. अनेक लसी या शीतकपाटातच राहू शकतात. लसी तर खर्च २०१० ते २०१६ दरम्यान ८० टक्के वाढला आहे. यात एकतृतीयांश खर्च प्रवासातील साठवणुकीसाठी येत असतो.
पुरवठा साखळी अकार्यक्षम असल्याने अनेक लसी लोकांपर्यंत पोहोचत नाहीत. दरम्यान, ड्रोनच्या माध्यमातून लसी पाठवल्यास खर्च मोठय़ा प्रमाणात वाचेल व लसी लवकर पोहोचतील. ट्रक, मोटरसायकल, सार्वजनिक वाहतूक साधने यांच्या मदतीने लसी पाठवणे व ड्रोनने लसी पाठवणे यांची प्रारूपे तयार करण्यात आली आहेत. ड्रोन विमानांच्या मदतीने लसीकरण ९६ टक्क्यांपर्यंत करता येईल व २० टक्के खर्च वाचेल. एक ड्रोन १.५ लिटर लस वाहून नेऊ शकते, प्रत्यक्षात ०.४ लिटर एवढीच गरज असते. दीड लीटरच्या एका उड्डाणाला ८.९३ डॉलर्स खर्च येईल. इतर खर्च ६० हजार डॉलर्स असेल.