काजू, बदाम यासारख्या सुक्या मेव्यातून मिळणारी प्रथिने हृदयासाठी उपयुक्त असून मांसाहारातून मिळणाऱ्या प्रथिनांमुळे हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग होण्याचा धोका बळावत असल्याचे एका अभ्यासातून आढळून आले आहे. अमेरिकेतील लोमा लिंडा विद्यापीठ आणि फ्रान्समधील राष्ट्रीय कृषी संशोधन विद्यापीठातील संशोधकांनी अभ्यासात सहभागी झालेल्या ८१,००० लोकांच्या माहितीचे विश्लेषण केले.

हा अभ्यास इंटरनॅशनल स्टडी आफ एपिडेमिओलॉजी या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. जे लोक जास्त प्रमाणात मांसाहार करतात त्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग होण्याचा धोका ६० टक्क्यांनी अधिक असतो, तर जे लोक सुक्या मेव्याचा आहारात समावेश करतात त्यांना हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीचे रोग होण्याचा धोका ४० टक्क्यांनी कमी असल्याचे या अभ्यासात आढळून आले. आहारातून मिळणाऱ्या मेदाचा परिणामदेखील हृदय आणि रक्तवाहिन्यांसंबंधीच्या रोगांवर होत असला तरी प्रथिनांमुळे स्वतंत्ररीत्या होणारा परिणाम हा महत्त्वाचा असून अद्याप दुर्लक्षित होता, असे लोमा लिंडा विद्यापीठातील गॅरी फ्रेजर यांनी सांगितले. लाल मांसाचा आहारात जास्त प्रमाणात समावेश केल्यामुळे हृदयाला धोका असून सुक्या मेव्याचे सेवन केल्यामुळे हदयाचे आरोग्य स्वस्थ ठेवण्यास मदत होते. पोषकाहारतज्ज्ञांनी मांसामधून वाईट मेद आणि सुक्या मेव्याच्या सेवनातून चांगले मेद शरीराला मिळत असल्याचे म्हटले आहे. या पदार्थामधील प्रथिनांमुळे होणाऱ्या जैविक परिणामदेखील होत असल्याचे आढळून आले आहे, असे फ्रेजर यांनी सांगितले. याआधीच्या अभ्यासामधून मांसाहार आणि शाकाहारातून मिळणाऱ्या प्रथिनांचे विश्लेषण करण्यात आले होते; परंतु या अभ्यासामध्ये लाल मांस आणि सुका मेवा या ठरावीक पदार्थामधून मिळणाऱ्या प्रथिनांवर अभ्यास करण्यात आला.