03 March 2021

News Flash

‘ड्राय जानेवारी’ संकल्पातून आरोग्यसिद्धी!

‘ड्राय जानेवारी चॅलेंज’ अर्थात वर्षांरंभी प्रथम मासातच मद्यापासून लांब राहायचे

इंग्लंडमधील सुसेक्स विद्यापीठातील संशोधकांनी नववर्षांतील संकल्पाची एक व्यावहारिक योजना, जिच्यातून तुमचे शारीरिक आरोग्य तर सुधारेलच; पण खर्च वाचून आर्थिक आरोग्यही साधले जाईल, शोधली आहे!

‘ड्राय जानेवारी चॅलेज’ अर्थात वर्षांरंभी प्रथम मासातच मद्यापासून लांब राहायचे, असा हा आव्हानात्मक संकल्प आहे. तो पाळल्यास वर्षभर मद्यपानावर नियंत्रण ठेवणे शक्य होते, असे संशोधकांना दिसून आले.

हा अभ्यास करण्यासाठी संशोधकांनी ‘ड्राय जानेवारी-२०१८’मध्ये सहभागी झालेल्या ८०० लोकांची माहिती एकत्रित केली. उल्लेखनीय बाब म्हणजे हा संकल्प पाळलेल्या व्यक्ती अगदी ऑगस्टपर्यंत कमी प्रमाणात मद्यपान करीत होत्या. त्यांची महिन्याला मद्यपान करण्याची वारंवारिता सरासरी ३.४ वरून २.१ पर्यंत कमी झाल्याचे दिसून आले.

याबाबत सुसेक्स विद्यापीठातील रिचर्ड डी व्हिसेर यांनी सांगितले की, एक महिना मद्यापासून दूर राहण्याच्या साध्या कृतीतून या व्यक्तींना दीर्घकाळ त्यापासून दूर राहण्यास मदत केली. इतकेच नाही तर, ऑगस्टपर्यंत हे लोक आठवडय़ाला एक जादा कोरडा दिवस (ड्राय डे) पाळू लागले. या संकल्पसिद्धीचे तातडीने दिसून आलेले इतर सुपरिणामही आहेत. हा संकल्प पाळलेल्या दहापैकी नऊ जणांनी पैशांची बचत केली. दहापैकी सात जणांना पहिल्यापेक्षा चांगली झोप लागू लागली. विशेष म्हणजे पाचपैकी तीन जणांचे वजनही कमी झाले, अशी माहिती त्यांनी दिली.

टक्केवारीत सांगायचे झाल्यास हा संकल्प केलेल्या ८८ टक्के लोकांनी आर्थिक बचत केली, ७० टक्के लोकांच्या सर्वसाधारण आरोग्यात सुधारणा झाली. ७१ टक्के लोकांची झोप सुधारली, तर ५८ टक्के लोकांचे वजन घटले. ज्यांनी संपूर्ण जानेवारीत दारूपासून दूर राहायचे ठरवले, पण प्रत्यक्षात त्यांना तसे पूर्णपणे शक्य झाले नाही, त्यांच्यातही मद्यपानाचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून आले. म्हणजेच ‘ड्राय जानेवारी’ पाळण्याचा नुसता प्रयत्न केला, तरी त्याचे फायदे होतात, हे सिद्ध झाले, असे डी व्हिसेर म्हणाले.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 31, 2018 12:32 am

Web Title: dry january challenge
Next Stories
1 शीतपेयांमुळे मूत्रपिंड विकारांची जोखीम अधिक
2 flashback 2018 : ‘हे’ आहेत वर्षभरातील स्वस्तात मस्त स्मार्टफोन
3 सिगारेटसोबत मद्य सोडणेही सोपे!
Just Now!
X