संधिवातासारखे दुखणे लोकांनी गांभीर्याने घेण्याची गरज आहे. कारण त्यातून हृदयविकार तसेच श्वासनलिकेचा संसर्ग वाढू शकतो, असा इशारा अखिल भारतीय आयुर्विज्ञान (एम्स) केंप्रच्या डॉक्टरांनी दिला आहे. डॉ. उमा कुमार यांच्या मते भारतात संधिवात फार गांभीर्याने घेतला जात नाही. पण त्याचे परिणाम घातक आहेत. संधिवाताचे २०० प्रकार असून, तो मोठय़ा रोगांचे लक्षण ठरू शकतो.

एम्समध्ये संधिवात दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी सांगितले की, संधिवात शरीराच्या कुठल्याही अवयवांवर परिणाम करतो. त्यामुळे हृदयविकार, पक्षाघात यांसारखे धोके निर्माण होतात.

हा रोग नॉन कम्युनिकेतला डिसीज (एनसीडी) यादीत नसल्याने त्यावर राष्ट्रीय आरोग्य मोहीम नाही. र्सवकष माहिती उपलब्ध नाही. रुग्णांना दावा करता येत नाही. रेल्वे प्रवासात त्यांना सवलत मिळत नाही. वयस्कर लोकांना जीवनशैलीमुळे तर तरुणांना अन्नसेवनाच्या वाईट सवयींमुळे संधिवात होतो. ऱ्हुमॅटॉइड संधिवात, ऑस्टिओआर्थायटिस हे त्याचे काही प्रकार आहेत. त्यात सांधे सुजणे, लाल होणे, सकाळी हात-पाय तीस मिनिटे जड होणे ही लक्षणे दिसतात. लठ्ठपणा, धूम्रपान, बैठे काम यामुळे संधिवात होतो. सध्या ८-२३ टक्के लोकांना हा रोग आहे. सरासरी १७ टक्के लोकांना त्याचा फटका बसतो. प्रदूषणाच्या अप्रत्यक्ष परिणामाचा तो एक भाग असू शकतो, असे त्या म्हणाल्या.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)