धूम्रपानासाठी ई-सिगरेट वापरल्याने यकृतामध्ये मेद साठण्याचा धोका असल्याचे एका अभ्यासात संशोधकांना आढळून आले आहे. ई-सिगरेट ही सामान्य सिगरेटच्या तुलनेने सुरक्षित असल्याचे त्यांच्या जाहिरातीतून सांगितले जात असल्याने ई-सिगरेट वापरणाऱ्यांचे प्रमाण वाढले आहे, असे अमेरिकेतील चार्ल्स आर ड्रय़ु वैद्यक आणि विज्ञान विद्यापीठातील थिओडोर सी फ्रीडमन यांनी सांगितले. परंतु यकृतामधील अतिरिक्त मेद आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकत असल्यामुळे ई-सिगरेट सामान्य सिगरेटच्या तुलनेने सुरक्षित नसल्याचा निष्कर्ष आम्ही काढला आहे, असे फ्रीडमन यांनी म्हटले.

ई-सिगरेटमध्ये निकोटिन असते याचा संबंध यकृताच्या मद्यविरहित मेदाच्या रोगांशी असतो. परंतु दीर्घकाल ई-सिगरेटने धूम्रपान केल्याने हृदय, मधुमेह आणि यकृतावर कोणता परिणाम होतो हे अद्याप अस्पष्ट आहे.

अभ्यासासाठी १२ आठवडे प्रयोग करण्यात आले या वेळी हृदयरोग आणि यकृतामधील मेदासाठी जबाबदार असणाऱ्या एपोलिपोप्रोटीन ई जनुकांचा अभाव असणाऱ्या उंदरांचा अभ्यास करण्यात आला. त्यांच्या रक्तात निकोटिनची पातळी ई-सिगरेटने धूम्रपान करणाऱ्यासाठी यातील एका गटाला ई-सिगरेटचा संसर्ग होईल अशा जागेत ठेवण्यात आले. तर दुसऱ्या गटाला क्षारयुक्त द्रवपदार्थाच्या संपर्कात येईल अशा ठिकाणी ठेवण्यात आले. संशोधकांनी यकृताचे नमुने गोळा केले आणि यकृतातील जनुकांवर झालेल्या परिणामाचे निरीक्षण केले. या वेळी ई-सिगरेटमुळे यकृतातील मेदाच्या वाढीला जबाबदार असणाऱ्या ४३३ जनुकांमध्ये बदल झाल्याचे आढळले. त्याचबरोबर (सिरकाडियन रिदम्स) जैविक घडय़ाळासंबंधित जनुकांमध्ये बदल झाल्याचे आढळले. सिरकाडियन रिदम्समध्ये बिघाड झाल्यास यकृतात मेद साठण्यासह यकृताचे आजार होतात.